विंडीजचा महाविजय! युगांडाचा 39 धावांतच फडशा

गेल्याच सामन्यात वर्ल्ड कपमधील आपल्या संस्मरणीय विजयाचा इतिहास रचणाऱया नवख्या युगांडाचा यजमान वेस्ट इंडीजने 39 धावांतच फडशा पाडत 134 धावांचा महाविजय मिळविला. या विजयामुळे वेस्ट इंडीजने सलग दुसऱया विजयासह सुपर एटच्या दिशेने आपले पाऊल टाकले आहे. त्यांच्या दोन लढती शिल्लक असल्या तरी केवळ एक विजय त्यांचे सुपर एटमधील स्थान निश्चित करू शकेल.

वेस्ट इंडीजने पहिल्या सामन्यात पापुआ न्यू गिनीवर मात केली होती, तर आज त्यांनी युगांडाचा धुव्वा उडवत आपले विजयी अभियान कायम राखले. युगांडाच्या माऱयापुढे वेस्ट इंडीजच्या टी-20 स्टार खेळाडूंना चौकार-षटकारांचा वर्षाव करता आला नाही. मात्र जॉन्सन चार्ल्सच्या 42 चेंडूंतील 44 आणि आंद्रे रसलच्या 17 चेंडूंतील 30 धावांच्या नाबाद खेळीने विंडीजला 173 धावांपर्यंत मजल मारू दिली, जी धावसंख्या युगांडासाठी हिमालयाएवढी भासली. 

 विंडीजच्या डावात सर्वांचा खारीचा वाटा

युगांडाच्या कमकुवत माऱयाचा विंडीजचे फलंदाज खरपूस समाचार घेतील अशी अपेक्षा होती, पण कोणीही घणाघाती फलंदाजीचे दर्शन घडवू शकला नाही. चार्ल्स आणि ब्रॅण्डन किंगने 41 धावांची सलामी दिली. चार्ल्सने निकोलस पूरनबरोबरही 35 धावांची भागी केली. पूरनने 3 षटकार ठोकत 22 धावा केल्या. तसेच रोव्हमन पॉवेल (23), शेरफन रुदरफोर्ड (22) यांनीही छोटय़ाशा खेळी करत विंडीजच्या डावात खारीचा वाटा उचलला. मग आंद्रे रसलने शेवटच्या षटकांत सहा चौकारांची बरसात करत विंडीजला 15 चेंडूंत 33 धावा काढून दिल्या.

 न्यूझीलंडचे स्थान धोक्यात

‘क’ गटातून अफगाणिस्तानपाठोपाठ वेस्ट इंडीजनेही सलग दुसऱया विजयाची नोंद केल्यामुळे न्यूझीलंडचे सुपर एटचे स्थान धोक्यात आले आहे. जर न्यूझीलंडला सुपर एटमध्ये धडक मारायची असेल तर त्यांना पुढील तिन्ही लढती जिंकाव्याच लागतील. एवढेच नव्हे तर, एखादा सामना पावसामुळे पूर्ण न होऊ शकल्यास ते आपोआप स्पर्धेबाहेर फेकले जातील. अफगाणिस्तानला पापुआ न्यू गिनीविरुद्ध 14 जूनला होणाऱया लढतीत मोठा विजय मिळवून सुपर एटमधील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करता येईल. त्याआधी 13 जूनला विंडीज आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱया लढतीत विंडीज जिंकला तर न्यूझीलंड स्पर्धेबाहेर फेकला जाईल आणि विंडीज सुपर एटमध्ये पोहोचेल. मात्र न्यूझीलंड जिंकला तर ‘क’ गटात सुपर एटसाठी चुरस वाढेल.

हुसेनच्या माऱयापुढे युगांडा उद्ध्वस्त

अकील हुसेनचा मारा युगांडाला सहनच झाला नाही. त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात रॉजर मुकासाला पायचीत करत विंडीजला पहिले यश मिळवून दिले आणि त्यानंतर युगांडाची जी घसरण सुरू झाली ती कुणीच थांबवू शकला नाही. त्याने सलग चार षटके गोलंदाजी टाकताना प्रत्येक षटकात विकेट घेण्याची किमया साधत 11 धावांत 5 विकेट टिपले आणि युगांडाची 7 बाद 23 अशी केविलवाणी अवस्था केली होती. तेव्हा जुमा मियागीच्या नाबाद 13 धावांमुळे युगांडाच्या धावसंख्येत आणखी 16 धावांची भर पडली. त्याचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या काढता आली नाही. हुसेन वर्ल्ड कपमध्ये 5 विकेटस् घेणारा विंडीजचा पहिला गोलंदाज ठरला आहे. तोच सामनावीर ठरला. त्याच्या माऱयामुळे युगांडाचा डाव 39 धावांत आटोपल्यामुळे त्यांनी वर्ल्ड कपमधील नेदरलॅण्ड्सच्या 39 या नीचांकाची बरोबरी साधली. 2014 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने नेदरलॅण्ड्सला 39 धावांत गुंडाळले होते.