T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा जल्लोष! ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर संघ ‘डीजे ब्रावो’च्या गाण्यावर थिरकला

टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठमोठे उलटफेर पाहायला मिळत असून दुबळ्या वाटणाऱ्या संघांनी बलाढ्य संघांना आस्मान दाखवले आहे. सुपर 8 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात गुलबदिन नायबने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियालाचा संपूर्ण संघ 127 धावांवर गारद झाला आणि 21 धावांनी अफगाणिस्तानने एतिहासीक विजयाची नोंद केली. या विजयामुळे अफगाणिस्तानमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण असून खेळाडूंनी सुद्धा डीजे ब्रावोच्या गाण्यावर ताल धरला.

सुपर 8 मध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकणे अनिवार्य होते. मात्र सहा वेळा चँपियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवणे तितके सोपे नव्हते. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या सलामीविरांनी तुफान फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन देत पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही आणि अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 148 या धावसंख्येवर बाद झाला.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चांगलेच झुंजवले. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नवीन उल हकने ट्रेविस हेडचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांमध्ये ग्लेन मॅक्सवेल (41 चेंडू 59 धावा) व्यतिरीक्त इतर फलदांज स्वस्तात माघारी परतले. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक चार विकेट घेत विजयामध्ये खारीचा वाटा उचलला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुले सध्या संपूर्ण अफगाणिस्तानात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विजयानंतर खेळांनीडूसुद्धा डीजे ब्राव्होच्या ‘Champion Champion’ या गाण्यावर ताल धरला होता. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.