येत्या 2 जून पासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. कोणते संघ उंपात्य फेरीत पोहचणार आणि कोणते संघ अंतिम फेरित पोहोचणार यावरुन जगभरातील माजी खेळाडूंनी भाकीतं वर्तवली आहेत. मात्र आता कोणता खेळाडू टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणार याचं भाकीत वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप यांनी केले आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान, इंग्लंड, ऑस्ट्रलिया आणि न्युझीलंड हे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 2007 साली टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप उंचावला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाला अद्याप विजेतेपदावर मोहर उमटवता आलेली नाही. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि फॉर्मात असलेल्या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा स्थिरावणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक चौकार ठोकून इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. तसेच विराट कोहलीने आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र असे असताना वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप यांनी इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉस बटलर हा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणार असल्याचे भाकित केले आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली आणि जॉस बटलर यांची तुलना केली तर विराट कोहली जॉस बटलरच्या पुढे आहे. विराटने टी-20 वर्ल्ड कपमधील 27 सामन्यांमधील 25 डावांमध्ये 81.50 च्या सरासरीने 1141 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 103 चौकार आणि 28 खणखणीत षटकार मारले आहेत. तसेच त्याच्या नावावर टी-20 वर्ल्ड कपमध्ये 14 अर्धशतकांची नोंद आहे. दुसरिकडे इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉस बटलरने 27 सामन्यांमध्ये 42.05 च्या सरासरीने 799 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद आहे.