पहिला दिवस यजमानांचाच; अमेरिकेपाठोपाठ वेस्ट इंडीजचाही विजय

टी-20 वर्ल्ड कपचा पहिला दिवस यजमानांचा ठरला. यजमान अमेरिकेने आपल्या 180 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेताना अॅरॉन जोन्सच्या 94 धावांच्या अभेद्य घणाघाती खेळीच्या जोरावर पॅनडाचा 7 विकेटनी सहज पराभव केला, तर वेस्ट इंडीजने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध सावध खेळ करत 19 व्या षटकात 5 विकेटनी विजयी सलामी दिली.

अमेरिकेने टॉस जिंकताच पॅनडाला फलंदाजी दिली, पण पॅनडाच्या नवनीत धालीवाल (61) आणि निकोलस कर्टन (51) यांच्या फटकेबाज खेळीमुळे ते 5 बाद 194 धावांचा पल्ला गाठू शकले. तळाला श्रेयस मोव्वाने 32 धावा ठोकल्यामुळे पॅनडाची मजल द्विशतकासमीप पोहोचली.

जोन्सचा झंझावात

अमेरिकेला पहिल्याच षटकाच्या दुसऱया चेंडूवर धक्का बसला. कलीम सानाने स्टीव्हन टेलरला शून्यावरच पायचीत केले. पण या सनसनाटी सुरुवातीनंतरही पॅनडाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. कर्णधार मोनांक पटेलही (16) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर आंद्रिस गोस आणि अॅरॉन जोन्सने पॅनेडियन गोलंदाजीला पह्डून काढताना षटकारांचा धो-धो पाऊस पाडला. जोन्सने 22 चेंडूंत अर्धशतक साजरे करताना विश्वचषकातील सर्वात वेगवान अमेरिकन अर्धशतकवीराचा मान पटकावला. त्याने सामना एकतर्फी करताना 40 चेंडूंत 10 षटकार ठोकत नाबाद 94 धावा केल्या. एवढेच नव्हे तर या दोघांनी तिसऱया विकेटसाठी 131 धावांची खणखणीत भागी रचली.

आकडेमोड

अमेरिकेने टी-20 क्रिकेटमध्ये पॅनडाविरुद्ध सलग पाचवा विजय मिळवला. जेरेमी गॉर्डनच्या एकाच षटकात 33 धावा. दोन नो आणि दोन वाइडमुळे दहा चेंडूंच्या या षटकांत गोसने 20 तर जोन्सने 8 धावा काढल्या. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात स्टुअर्ट ब्रॉड (36) हाच पुढे आहे. कोरी अॅण्डरसन हा दोन देशांकडून खेळणारा टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटमधील पाचवा खेळाडू ठरला. याआधी रोलोफ वॅन डर मर्व्ह, डर्क नॅनेस, डेव्हिड व्हिस, मार्क चॅपमन हे दोन देशांकडून टी-20 वर्ल्ड कप खेळले आहेत.

विंडीजचा सावध विजय

पापुआ न्यू गिनी हा दुबळा संघ 138 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे वेस्ट इंडीज त्यांचा धुव्वा उडवताना चौकार-षटकारांची आतषबाजी करील अशी अपेक्षा होती. पण वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी 19 व्या षटकापर्यंत सावध खेळ करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि 5 विकेटनी विजयी सलामी दिली.

पापुआ न्यू गिनीला दीडशेच्या आत गुंडाळल्यामुळे विंडीजकडून 15 षटकांत सामना संपवण्याची शक्यता होती; पण ब्रॅण्डन किंग (34), निकोलस पूरन (27) आणि रोस्टन चेसने (ना. 42) वन डे क्रिकेटला साजेसा खेळ करत फारसा धोका न पत्करता विजयी लक्ष्य गाठले. 137 धावांचे माफक आव्हान असतानाही विंडीजने केवळ 5 षटकारच ठोकले आणि 6 चेंडू आधी विजय मिळविला. रोस्टन चेसने शंभरीत अर्धा संघ गमावल्यामुळे विंडीज अडचणीत सापडली होती, पण चेसने आंद्रे रसलच्या साथीने 18 चेंडूंत 40 धावा चोपून काढल्या; पण या लक्ष्यासाठीही विंडीजला आपला अर्धा संघ गमवावा लागला. पापुआ न्यू गिनीने नवोदित असूनही विंडीजला विजयासाठी 19 व्या षटकापर्यंत नेले.

अमेरिकेप्रमाणे वेस्ट इंडीजनेही टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण घेतले. फलंदाजीला आलेल्या पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजांचा विंडीजच्या माऱयासमोर निभाव लागलाच नाही. रोमारिओ शेफर्डने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर टॉनी उराला  (2) टिपले तर अकील होसेनने लिगा सिआकाचा त्रिफळा उडवत पापुआ न्यू गिनीला दुसरा धक्का दिला. यानंतर फक्त सेसे बाऊने 43 चेंडूंत 50 धावांची खेळी करत संघाला सावरले. तळाला किपलिन डोरिगाने 27 धावा फटकावत संघाला 8 बाद 136 अशी धावसंख्या उभारून दिली होती.