अमेरिका आणि पाकिस्तान संघात डलासमधील ग्रँड प्रेयरी मैदानावर यंदाच्या टी20 वर्ल्डकपमधील अकरावा सामना खेळला गेला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या लढतीत यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करत सर्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानसमोर 19 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानचा संघ 13 धावाच करू शकला आणि अमेरिकेने यंदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे या पराभवामुळे साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुश्की पाकिस्तानवर ओढवू शकते.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघही निर्धारित षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 159 धावा करू शकला. त्यानंतर सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर घेण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा आरोन जोन्स आणि हरमीत सिंग फलंदाजीला उतरले. दोघांनी 6 चेंडूत 18 धावा करत पाकिस्तानपुढे विजयासाठी 19 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला पाकिस्तानचा संघ 6 चेंडूत फक्त 13 धावा करू शकला. अमेरिकेच्या सौरभ नेत्रावाळकर याने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानला जखडून ठेवले आणि संघाला विजय मिळवून दिला.
दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने या पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. सलग दोन विकेट गेल्याने आम्ही बॅकफूटवर गेलो. तसेच मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू विकेट घेऊ शकले नाहीत. अमेरिकेने गोलंदाजी आणि फलंदाजीत आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली, असे बाबर आझम म्हणाला.