T20 WC 2024 : सॉल्टच्या वादळात वेस्ट इंडिजची धुळधाण, इंग्लंडचा 8 विकेट्सनी विजय

फिलिप सॉल्टच्या वादळी खेळीच्या बळावर इंग्लंडने यजमान वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत सुपर-8मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 181 धावांचे आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17.3 षटकांमध्ये गाठले. फिलिप सॉल्ट याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 87 धावा चोपल्या. जॉनी बेअरस्टो याने त्याला 26 चेंडूत नाबाद 48 धावा काढत उत्तम साथ दिली. सॉल्टला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. कर्णधार जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट या जोडीने इंग्लंडला 67 धावांची सलामी दिली. बटलर 25 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला मोईन अलीही 13 धावांवर माघारी परतला. मात्र यानंतर सॉल्ट आणि बेअरस्टोने चौफेर फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने चार्ल्सच्या 38, पूरनच्या 36 आणि पॉवेलच्या 36 धावांच्या बळावर निर्धारित षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. रुदरफोर्ड याने 28 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून आर्चर, राशिद, मोईन अली आणि लिविंगस्टन यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.