T20 WC 2024 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर मोठा विजय, झंपा ठरला विजयाचा शिल्पकार

आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये शनिवारी क्रिकेटमधील दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सामना खेळला गेला. बारबाडोसमध्ये झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. फिरकीपटू एडम झंपा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने या लढतीत प्रथम फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. हेड 34, वॉर्नर 39, मार्श 35, मॅक्सवेल 28 आणि स्टॉयनिस 30 अशा सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 201 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 6 बाद 165 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी विजय मिळवला.

कर्णधार जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट यांनी इंग्लंडला 7 षटकात 73 धावांची सलामी दिली. सॉल्ट 37 आणि बटलर 42 धावांवर बाद झाला. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना झंपाने बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा एकही फलंदाज आवश्यक धावगती राखू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवत मोठे फटके मारण्यापासून रोखले आणि विजय मिळवला.