T20 WC 2024 : उलटफेराची मालिका सुरूच, अफगाणिस्तानने केला न्यूझीलंडचा दारुण पराभव

अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये उलटफेरांची मालिका सुरुच आहे. अमेरिका, कॅनडानंतर आता अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत अफगाणिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. गुयानाच्या प्रोविडेन्स मैदानात झालेल्या लढतीत अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर 84 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला.

अफगाणिस्तानने आंतरराष्ट्री टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 षटकांमध्ये 6 बाद 159 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावांमध्ये बाद झाला आणि अफगाणिस्तानने 84 धावांनी बाजी मारली. टी20 वर्ल्डकपमधील न्यूझीलंडचा हा धावांच्या हिशेबाने सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

 

अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विययाचा नायक रहमानुल्लाह गुरबाज राहिला. त्याने 56 चेंडूत 80 धावांची खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह इब्राहिम जादरान याने 44 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीमध्ये फजलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवत प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.