T20 WC 2024 : लाजिरवाण्या कामगिरीनंतर केन विलियम्सननं कर्णधारपद सोडलं; सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही नाकारलं

टी20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडची कामगिरी सुमार राहिली आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. या लाजिरवाण्या कामगिरीची जबाबदारी केन विलियम्सन याने घेतली असून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

केन विलियम्सन याने मोठा निर्णय घेत वन डे आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही नाकारले आहे. त्यामुळे तो निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. अर्थात यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, केन विलियम्सन याने आपल्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. “न्यूझीलंडसाठी मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळलो याचा मला आनंद असून भविष्यातही मी योगदान देत राहीन. पण सध्या मी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट स्वीकारण्यास असमर्थ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. पण क्रिकेटबाहेरील माझे जीवन खुप बदलले आहे. मलामाझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे”, असे केन विलियम्सन म्हणाला. याचाच अर्थ त्याने कर्णधारपद सोडले असले तरी आगामी काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

बोल्टचा अखेरचा वर्ल्डकप

केन विलियम्सन याने कर्णधारपद सोडण्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने मोठा निर्णय घेतला होता. हा आपला अखेरचा टी20 वर्ल्डकप असल्याचे बोल्टने जाहीर केले होते. आता टी20 प्रकाराचा पुढील वर्ल्डकप 2026 मध्ये होणार आहे. त्यात बोल्ट आणि विलियम्सन खेळण्याची शक्यता मावळली आहे.