यंदाच्या टी20 वर्ल्डकपमध्ये अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळाले. नवख्या संघांनीही दिग्गज संघांना पाणी पाजले. त्यामुळे न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका सारख्या संघांना साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. यात दक्षिण आफ्रिकेचीही भर पडली असती. पण चोकर्सचा शिक्का पुसत आफ्रिकेने नेपाळवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला आणि सुपर-8 मध्ये प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेने नेपाळपुढे विजयासाठी 116 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र आफ्रिकेने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत नेपाळला 7 बाद 114 धावांवर रोखले आणि एका धावेने विजय मिळवला. आफ्रिकेकडून तरबेज शम्सी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर एडन मार्करम आणि अॅनरिच नॉखिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
South Africa survive 😲#T20WorldCup | #SAvNEP 📲 https://t.co/AIFzQo3XNF pic.twitter.com/SHaairZi1E
— ICC (@ICC) June 15, 2024
नेपाळची झुंज
आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कुशाल (13) आणि आसिफ (42) यांनी नेपाळला चांगली सुरुवात करून दिली. दोघात 35 धावांची भाागिदारी झाली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर अनिल (27) व्यतिरिक्त एकही खेळाडू साधा दहा धावांचा आकडाही पार करू शकला नाही. त्यामुळे नेपाळला पराभवाचा सामना करावा लागला.
आफ्रिकेला 115 धावांत रोखले
तत्पूर्वी नेपाळने प्रथम गोलंदाजी करताना बलाढ्य आफ्रिकेला अवघ्या 115 धावांमध्येच रोखले. आफ्रिकेकडून रिझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याखालोखाल ट्रिस्टन स्टब्स याने नाबाद 28 धावा केल्या. नेपाळकडून कुशाल याने सर्वाधिक 4, तर दिपेंद्र सिंह याने 3 विकेट्स घेतल्या.