सर्व संघ अडकले नेट रनरेटच्या जाळय़ात; पहिल्या गटातून चौघांना, तर दुसऱया गटातून तिघांना उपांत्य फेरीची संधी

जर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केला असताना तर सुपर एटच्या पहिल्या गटातून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली असती, पण झाले नेमके उलटे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीचा गुंता वाढवला असून चारही संघ नेट रनरेटच्या जाळय़ात अडकले आहेत. कोणता संघ या जाळय़ातून सुटेल हे कुणीच सांगू शकत नाही.

सुपर एटच्या दुसऱया गटात दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले असले तरी विंडीज आणि इंग्लंडनेही प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे या गटातून दोन पराभवांमुळे अमेरिका बाद झाली असली तरी उपांत्य फेरी कोण गाठणार याचा फैसला वेस्ट इंडीज-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीनंतरच स्पष्ट होईल.

तसेच पहिल्या गटातही तीच स्थिती निर्माण झाली आहे. इथे तर बांगलादेशही उपांत्य फेरी गाठू शकतो. त्याचप्रमाणे कोणताही संघ बाहेरही फेकला जाऊ शकतो. फक्त हिंदुस्थानने दोन लढती जिंकल्या असल्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याची सर्वाधिक संधी हिंदुस्थानलाच असेल.

असे आहे पहिल्या गटाचे समीकरण

जर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान जिंकले तर

जर हिंदुस्थानविरुद्ध ऑस्ट्रेलिया एका धावेने जिंकला तर अफगाणिस्तानला नेट रनरेटमध्ये आघाडी घेण्यासाठी बांगलादेशचा किमान 36 धावांनी पराभव करावा लागेल किंवा धावांचा पाठलाग करत असल्यास किमान 160 धावांचे आव्हान असल्यास 16 व्या षटकांत विजय मिळवावा लागेल.

हिंदुस्थान असा बाद ठरू शकतो

हिंदुस्थान नेट रनरेटमध्ये खूप पुढे आहे. हिंदुस्थानला मागे टाकण्यासाठी आधी ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानला 40 पेक्षा अधिक धावांनी हरवावे लागेल. तेव्हा ते हिंदुस्थानच्या पुढे जातील आणि त्यानंतर अफगाणिस्तानला बांगलादेशचा 85 धावांनी पराभव करावा लागेल. असे झाले तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे संघ नेट रनरेटच्या बाबतीत पहिले दोन क्रमांक पटकावतील व तिसऱया स्थानावर घसरलेला हिंदुस्थान बाद होईल.

जर हिंदुस्थान आणि बांगलादेश जिंकले तर

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर हिंदुस्थान विजयाच्या हॅट्ट्रिकसह उपांत्य फेरी गाठेल आणि त्यानंतर बांगलादेश व अफगाणिस्तानलाही उपांत्य फेरीची सुवर्णसंधी प्राप्त होईल. या स्थितीत बांगलादेशला नेट रनरेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला मागे टाकण्यासाठी अफगाणिस्तानवर किमान 30 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल, पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा 60 धावांनी पराभवसुद्धा अपेक्षित आहे. हे समीकरण काहीसे गुंतागुंतीचे आहे.

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश जिंकले तर

उर्वरित दोन सामन्यांत हा निकाल लागला तर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ चार-चार गुणांसह उपांत्य फेरी गाठतील.

हिंदुस्थान, अफगाणिस्तान जिंकले तर

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी निर्माण होईल. या स्थितीत ऑस्ट्रेलियापेक्षा नेट रनरेट सुधारण्यासाठी आवश्यक धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानला गाठावे लागेल. या स्थितीत ऑस्ट्रेलिया बाद ठरू शकतो.