धक्के सुरू, विंडीजने कांगारूंना नमवले; सराव सामन्यात यजमानांचा 35 धावांनी विजय

टी-20 क्रिकेटमध्ये पावलोपावली धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळतात. टी 20 वर्ल्ड कपचा धमाका सुरू व्हायला आता काही तास उरले असताना यजमान वेस्ट इंडीजने धमाका केला. त्यांनी स्पर्धेच्या सराव सामन्यात खळबळजनक विजयाची नोंद करताना ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी हरवण्याचा करिश्मा दाखवला. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱया ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीजने पराभव केल्याने आगामी विश्वचषक स्पर्धेत मोठमोठे धक्के पाहायला मिळणार यात तीळमात्र शंका नाही.

त्रिनिदाद येथे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या मुळावर आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 257 धावांचा डोंगर उभा केला. वेस्ट इंडीजच्या स्पह्टक फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. वेस्ट इंडींजच्या निकोलस पुरनने 25 चेंडूंत 75 धावा फोडून काढल्या, तर कर्णधार रोव्हमन पॉवेलने 52 धावा करून पुरनला उत्तम साथ दिली. शेरफेन रुदरपर्ह्डने 18 चेंडूंत 47 धावांची खेळी करून विंडीजला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. वेस्ट इंडीजने दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेदेखील 222 धावा कुटल्या; मात्र त्यांना 35 धावांनी पराभव पत्करावा लागला. सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि अॅश्टन अगर लवकर तंबूत परतले. कर्णधार मिचेल मार्शदेखील 4 धावा करून तंबूत परतल्याने 60 धावांवर 3 बाद अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली होती.