पाकिस्तानचे पॅकअप; विंडीजपाठोपाठ अमेरिकाही सुपर एटमध्ये

अपेक्षेप्रमाणे लाऊडरहिलचा दुसरा सामनाही एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील हा महत्त्वाचा साखळी सामना किमान पाच-पाच षटकांचा खेळला जावा म्हणून आयसीसीने शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना पावसाने ओले केले. पावसाच्या या अवकृपेमुळे गतउपविजेत्या पाकिस्तानवर साखळीतच बाद होण्याचे अस्मानी संकट ओढावले. मात्र आपली पहिलीच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळत असलेल्या अमेरिकेने ‘अ’ गटातून आपले सुपर एट स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे स्पर्धेचे दोन्ही यजमान सुपर एटमध्ये पोहोचले असून ते ‘ब’ गटात एकमेकांशी भिडतील.

लाऊडरहिल येथे साखळीतील तीन सामने खेळविले जाणार होते, मात्र गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या मैदानात एकाही चेंडूंचा खेळ होऊ शकला नाही. नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामनाही रद्द करण्यात आला होता तर आजचा सामनाही तसाच पावसात भिजला. लाऊडरहिलला तिसरा सामना हिंदुस्थान विरुद्ध कॅनडा असा खेळविला जाणार आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट कायम आहे. त्यामुळे तिसरा सामनाही एकही चेंडू न टाकताच रद्द करण्याचे दुर्दैव आयसीसीच्या पदरी पडू शकते.

आजचा सामना रद्द झाल्यामुळे यजमान अमेरिका पाच गुणांसह थेट सुपर एटमध्ये पोहोचली तर अवघ्या दोन गुणांवर असलेला पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. गतउपविजेता बाद झाल्यानंतर गत जगज्जेता इंग्लंडलाही साखळीतच बाद होण्याची भीती आहे.