टी-20 वर्ल्ड कपवर पावसाचे ढग; दोन सराव सामने करावे लागले रद्द

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या स्वारीवर आलेले सर्व 20 संघ अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये पोहचलेत, पण त्यांच्या जोडीला पावसाचे ढगही पोहचलेत. त्यामुळे वर्ल्ड कपच्या ‘रन’संग्रामापूर्वी होणाऱया सराव सामन्यात पावसाचीच बॅटिंग सुरू असल्यामुळे  दोन सराव सामने रद्द करावे लागलेत. परिणामतः आयसीसी आणि क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. टी-20 वर्ल्ड कपवरही पावसाचे सावट असल्याने सराव सामन्याप्रमाणे मुख्य स्पर्धेतही पावसाचे विघ्न आले तर स्पर्धेला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

27 मे ते 1 जून या कालावधीत अमेरिका, त्रिनिनाद आणि टोबॅगो या देशांमध्ये टी-20 वर्ल्ड कपपूर्वी एकूण 16 सराव सामने होत आहेत, मात्र पहिल्या आठ सराव सामन्यांपैकी दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले. 28 मे रोजी झालेला यजमान अमेरिका व बांगलादेश यांच्यातील सराव सामना पावसात वाहून गेला. याचबरोबर अफगाणिस्तान व ओमान यांच्यातील 29 मे रोजीचा सामनाही पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. हा सामना त्रिनिनाद आणि टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर होणार होता, मात्र पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला. आता पुढील सराव सामन्यांपैकी किती सामन्यांना पावसाचा फटका बसतोय, ते बघावे लागेल.