क्रिकेटयुद्ध खतरें में! हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

इसिस या दहशतवादी संघटनेने आता हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर लोन वुल्फ अटॅक (एकाच दहशतवाद्याकडून केला जाणारा हल्ला) करण्याची धमकी दिल्याने टी-20 वर्ल्ड कपमधले ‘क्रिकेटयुद्धच खतरे में’ पडले आहे. हल्ल्याच्या धमकीनंतर न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

इसिसने महिनाभरापूर्वी वेस्ट इंडीज येथे होणाऱया सामन्यांवरही हल्ल्याची धमकी दिल्याची माहिती त्रिनिदादचे पंतप्रधान किथ राऊली यांनी दिली होती. या धमकीमुळे पॅरेबियन बेटांवरील सामन्यांचीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती राऊली यांनी दिली होती. आता पुन्हा एकदा इसिसचा धमकीचा व्हिडीओ समोर आल्याने आयोजकांसह आयसीसीही चिंतीत झाली आहे.

धमकीत गांभीर्य नाही

इसिसने लोन वुल्फ हल्ल्याची धमकी दिली असली तरी त्यांच्या हल्ल्यात गांभीर्य नसल्याचे मत न्यूयॉर्कची गर्व्हनर पॅथी होचुल यांनी व्यक्त केले आहे. हा हल्ला विश्वसनीय नाही. त्यामुळे या हल्ल्याचा क्रिकेटयुद्धालाही फारसा फरक पडणार नसल्याचे पॅथी यांनी स्पष्ट केले. धमकीनंतर स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाहत्यांना सुरक्षित करण्यासाठी आम्ही स्थानिक सुरक्षा एजन्सीच्या मदतीने एकत्रित काम करत आहोत. हा हल्ल्याचा कोणताही धोका नसला तरी आम्ही न्यूयॉर्क पोलिसांना सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत आणि आम्ही त्यावर नजर ठेवून आहोत.

एप्रिलमध्येच मिळाली धमकी

वेस्ट इंडीजप्रमाणे अमेरिकेलाही एप्रिलमध्येच इसिसची पाकिस्तानी शाखा असलेल्या आयएसखोसरनकडून ही धमकी मिळाल्याची माहिती नासाऊ काऊंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी दिली. या धमकीत 9 जूनला होणाऱया हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला टार्गेट करण्यात आले आहे. इसिसकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडीओत एकाच हल्लेखोराला हल्ला करायला सांगितल्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. आम्ही चोख बंदोबस्त ठेवला आहे. आमची सुरक्षा व्यवस्था ही या काऊंटीच्या इतिहासातील सर्वात मोठी सुरक्षा व्यवस्था असेल. 9 जूनला होणारा सामना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात अत्यंत सहजपणे खेळला जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो, असेही रायडर म्हणाले.

सुरक्षितता हीच प्राथमिकता

टी-20 वर्ल्ड कपदरम्यान सर्वांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही या स्पर्धेसाठी सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. आम्ही यजमानांच्या सहकार्याने स्पर्धेदरम्यान कोणत्याही परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था भेदली जाणार नाही, याची समीक्षा करतोय. ही स्पर्धा सहजपणे पार पाडली जावी आणि त्यासाठी लागणारी सर्व सुरक्षा यंत्रणा आम्ही उभारली असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

धमकीमुळे अमेरिका-विंडीजच्या पर्यटनालाही धोका

वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचे एक वेगळेच वातावरण आजवर पाहिले गेले आहे. तिथल्या रस्त्यांवर त्यांचे पंतप्रधानही सहजपणे फिरताना आजवर दिसत होते. जगातला कितीही मोठा खेळाडू असो किंवा राजकीय व्यक्ती सारेच मुक्तपणे बिनधास्तपणे संचार करायचे, फिरायचे आणि पॅरेबियन बेटांचा मनमुराद आनंद लुटायचे. तसेच काहीसे वातावरण अमेरिकेतही पाहायला मिळणार होते. या वर्ल्ड कपनिमित्त हजारोंच्या संख्येने क्रिकेट चाहते अमेरिका आणि पॅरेबियन बेट गाठणार आहेत. पण इसिसच्या धमकीनंतर सारे चित्र बदललेले दिसणार, हे निश्चित आहे. अत्यल्प लोकसंख्या असलेल्या पॅरेबियन बेटांवर सुरक्षा पुरवण्यासाठी आयसीसी आणि आयोजकांना फार मोठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. अशा दहशतवादी हल्ल्यांसाठी पॅरेबियन बेटे कधीच तयार नव्हती. या बेटांचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन हे पर्यटन हेच आहे. दहशतवादी धमकीमुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी पॅरेबियन बेटांवर जाण्याचे प्लॅन आखणाऱया क्रिकेटप्रेमींना आणि पर्यटकांना पुन्हा नव्याने विचार करावा लागणार आहे. याचा थेट फटका विंडीज आणि अमेरिकेच्या पर्यटनाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2007 च्या वर्ल्ड कप आयोजनावेळी हिंदुस्थानचा संघ साखळीतच बाद झाल्यामुळे आयोजकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. पुन्हा एकदा क्रिकेट आयोजनामुळे विंडीजमध्ये त्याची पुनरावृत्ती भीती निर्माण झाली आहे.