रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाने टी20 जगज्जेतेपदाचा 17 वर्षांचा दुष्काळ संपवला आणि चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपली मोहर उमटवली. वर्ल्ड कप विजेता टीम इंडियाचा संघ बेरिल चक्रीवादळामुळे 29 जूनपासून बार्बाडोसमध्ये अडकला होता. परंतु आता त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. टीम इंडियाचा संघ उद्या (04 जुलै 2024) सकाळी सहा वाजता दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर दिल्ली ते मुंबई असा प्रवास करून मुंबईमध्ये विजयी रॅली निघणार आहे.
टी20 वर्ल्ड कप विजेत्या हिंदुस्थानी संघाचे ग्रँड वेलकम करण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. त्यांची प्रतिक्षा आता संपली असून उद्या (4 जुलै 2024) सकाळी सहा वाजता रोहित सेना दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे. त्यानंतर सकाळी अकराच्या दरम्यान टीम इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास टीम इंडियाचे खेळाडू मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत सर्व खेळाडूंची विजयी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर BCCI ने खेळाडूंसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अशी निघणार T20 World Cup 2024 विजेत्या टीम इंडियाची विजयी मिरवणूक
>> सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर होणार दाखल
>> सकाळी 9.30 च्या सुमारास पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी टीम इंडिया रवाना होणार
>> सकाळी 11 च्या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाची भेट होणार
>> दुपारी एकच्या आसपास टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार
>> संध्याकाळी पाच वाजता नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक निघणार
>> मिरवणूक झाल्यानंतर BCCI च्या माध्यमातून वानखेडे स्टेडियमवर छोटा कार्यक्रम पार पडणार