रोहित-विराटचा सलामीचा सराव; बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा आज सराव सामना

आयपीएलची धामधुम उरकून हिंदुस्थानी संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल झाला असून, हिंदुस्थानी संघ टी-20 विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात शनिवारपासून करणार आहे. शनिवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱया सराव सामना हा हिंदुस्थानसाठी अत्यंत महत्त्वाचा असून टी-20 विश्वचषकातील अंतिम अकरा कोण हे ठरवले जाईलच, पण या सराव सामन्यात रोहित शर्माच्या साथीला विराट कोहली सलामीचा सराव करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सलामीला कोण उतरणार हे तेव्हाच स्पष्ट होईल.

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना हा आयर्लंडविरुद्ध 5 जून रोजी खेळणार आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापुर्वी बांगलादेशविरुद्ध होणारा हा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदुस्थानची सलामीची जोडी कोण असेल?, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराचा पार्टनर कोण असेल? या प्रश्नांची उत्तरे सराव सामन्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उद्या शनिवारी हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना होणार आहे, मात्र उद्याच्या सराव सामन्यावर पावसाचे सावट असल्याने हिंदुस्थानी संघाचा सराव होतो की सामना पावसामुळे वाहून जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुमराचा पार्टनर कोण?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी, जसप्रीत बुमरा याने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन आयपीएलमध्ये केले आहे, मात्र अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज यांच्यासाठी यंदाचे आयपीएल फारसे चांगलेले गेलेले नाही. त्यामुळे बुमराचा पार्टनर ठरवण्याचे खडतर आव्हान हे कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापुढे असणार आहे.

हिंदुस्थानी संघातील सर्वच खेळाडू हे आयपीएल खेळून आल्यामुळे त्यांचा सराव झालेला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध होणारा सराव सामना हा केवळ अंतिम 11 शोधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. उद्याच्या सामन्यात केवळ हिंदुस्थानी खेळाडूंची लय तपासण्याची एक नामी संधी देणार आहे. सध्या जैसवाल हा चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला बाकडय़ावर बसवले जाऊ शकते. विराट कोहली तुफान फॉर्मात असल्याने उद्याच्या सामन्यात रोहित आणि विराट ही जोडी सलामीला उतरताना दिसू शकते. तसेच चेन्नईकडून आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करणार्या शिवम दुबेला संघात स्थान मिळते का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.