अपराजित असलेला रोहित शर्माचा हिंदुस्थान संघ टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. 2022 च्या कटू आठवणी पुसत इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचा बदला घेण्याचेही ध्येय हिंदुस्थानने केंद्रित केल्यामुळे प्रोव्हिडन्सच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा धमाकेदार खेळ पाहायला मिळणार आहे.
हिंदुस्थानी संघाला गेल्या 11 वर्षांत एकदाही आयसीसीच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. ते अपयश धुऊन काढण्याचे ध्येय पुन्हा एकदा रोहित शर्माने उराशी बाळगले आहे. गेल्या वर्षीही वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न ऑस्ट्रेलियाने धुळीस मिळवले होते. पण यावेळी हिंदुस्थानने सुपर एटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या वर्ल्ड कप पराभवाचा बदलाच घेतला नाही, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आणले. आता त्याची पुनरावृत्ती जगज्जेत्या इंग्लंडविरुद्धही करण्याची तयारी हिंदुस्थानने केली आहे. 2022 च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जोस बटलरच्याच संघाने हिंदुस्थानचा दारुण पराभव केला होता आणि आपले जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार केले होते. हिंदुस्थानसाठी यंदाचे वर्ल्ड कप वचपा काढण्याचीच स्पर्धा असल्यामुळे गयानातही त्याचीच झलक मिळण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान काकणभर सरस
एकीकडे हिंदुस्थानने साखळीतून सुपर एटमध्ये थाटात प्रवेश केला, तर दुसरीकडे इंग्लंडचा साखळीतून सुपर एटमधला प्रवास रडतखडत झाला होता. ‘ब’ गटातून स्कॉटलंडला सुपर एटमध्ये पोहोचण्याची संधी निर्माण झाल्यामुळे जगज्जेत्यांवर साखळीतच गारद होण्याचे संकट ओढावले होते. मात्र दुबळय़ा नामिबिया आणि ओमान संघांविरुद्ध मोठे विजय मिळवत इंग्लंडने सुपर एटमध्ये स्थान मिळवले. तसेच सुपर एटमध्येही हिंदुस्थान मोठय़ा ऐटीत उपांत्य फेरीत पोहोचला तर इंग्लंडला इथेही दक्षिण आफ्रिकेकडून मात खावी लागली होती. पण अमेरिका आणि विंडीजविरुद्ध विजय मिळवल्यामुळे ते उपांत्य फेरीत पोहोचले. म्हणजेच हिंदुस्थान टी-20 वर्ल्ड कपच्या दोन्ही टप्प्यात अपराजित आहे तर इंग्लंडला दोन्ही टप्प्यांवर हार सहन करावी लागली आहे. तसेही टी-20 क्रिकेटच्या इतिहासात हिंदुस्थान इंग्लंडविरुद्ध 12-11 असा एका विजयाने पुढे आहे.
जैसवाल बेंचवरच बसणार
हिंदुस्थानने गेल्या सातही सामन्यांत विराट कोहलीवर सलामीवीर म्हणूनच विश्वास ठेवत त्याच्या फॉर्मची वाट पाहिलीय. विराटच्या फलंदाजीला अपेक्षित यश लाभले नसले तरी हिंदुस्थानी संघव्यवस्थापन उपांत्य फेरीतही त्याला तिसऱया क्रमांकावर पाठवण्याचे धाडस दाखवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यशस्वी जैसवालला उद्याही बेंचवरच बसून खेळ पाहावा लागणार आहे. हिंदुस्थानी संघात कोणताही बदल होण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत सर्वच खेळाडूंनी संघाच्या यशात खारीचा वाटा उचलल्यामुळे हिंदुस्थानला दमदार विजय नोंदविता आला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध एकही बदल होणार नसल्याचे संकेत मिळाले आहे.
रोहित–बुमरावर मदार
हिंदुस्थानची फलंदाजी ही इंग्लंडपेक्षा सरस आहेच, पण हिंदुस्थानच्या गोलंदाजीची इंग्लंड बरोबरीही करू शकत नाही. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफान फलंदाजीने समस्त हिंदुस्थानी संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धही रोहित त्याच वेगाने खेळून हिंदुस्थानला सक्षम सलामी देण्यासाठी सज्ज आहे. त्याला विराटची साथ लाभेल, असा सर्वांना विश्वास आहे. विराटची अपयशाची मालिका या सामन्यात मोडली जाईल, असा विश्वास रोहितने व्यक्त केलाय. जे विराट अद्याप करता आलेले नाही तो खेळ उपांत्य फेरीत पाहायला मिळेल, अशी साऱयांनाच अपेक्षा आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जाडेजाने हिंदुस्थानच्या फलंदाजीला सर्वशक्तिमान केले आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना अद्याप अपेक्षित सूर गवसला नसला तरी कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्टवर त्यांचा सर्व खेळ अवलंबून आहे. पण त्यांच्या समोर सर्वात मोठे संकट जसप्रीत बुमरा आणि कुलदीपच्या गोलंदाजीला सामोरे जाण्याचे आहे. दोघांच्या गोलंदाजीने सर्वांचीच झोप उडवलेली आहे. त्यांचा हा फॉर्म उपांत्य फेरीतही नक्कीच असेल.