टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने केलेल्या 76 धावांच्या निर्णायक खेळीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचे आव्हान दिले होते. मात्र आव्हानाचा पाटलाग करण्यात दक्षिण आफ्रिका अपयशी ठरली आणि टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. विजेतेपद पटकावल्यानंतर विराटला सामनाविराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्याने हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप असल्याचे जाहिर केले. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सुद्धा सांगितले. त्यामुळे चाहत्यांना चांगला धक्का बसला आहे. सामनाविराचा किताब घेतल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केला.
“हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप होता, त्यामुळे या वर्ल्ड कपचा शेवट मला गोड करायचा होता. महत्वाच्या दिवशी संघासाठी महत्वाचे योगदान देण्याची संधी मला देवाने दिली. त्यामुळे आता फक्त वर्ल्ड कप उचलायचा आहे आणि पुढील पिढीला संधी द्यायची आहे.” असे भावनीक वक्तव्य करत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.