दुष्काळ संपला! जगज्जेतेपदाचा सूर्योदय!! नॉनस्टॉप आठव्या विजयासह 17 वर्षानंतर टीम इंडिया जिंकली

राक्षसी फटकेबाजी करणाऱया क्लासनची पंडय़ाने काढलेली विकेट… 24 चेंडूंत 26 धावांची गरज असताना जसप्रीत बुमरा-अर्शदीप सिंहचा सर्जिकल स्ट्राईक आणि शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने टिपलेल्या अद्भुत झेलाने हातून निसटलेला टी-20 वर्ल्डकप हिंदुस्थानी संघाला जिंकून दिला. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला 17 वर्षांचा टी-20 जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि चौथ्या जगज्जेतेपदावर टीम इंडियाने शिक्कामोर्तब केले.

177 धावांचा पाठलाग करणाऱया दक्षिण आफ्रिकेला प्रारंभीच जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंहने हादरवत हिंदुस्थानला सामन्यावर पकड मिळवून दिली होती. पण क्विंटन डिकॉक आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी हिंदुस्थानच्या फिरकीला पह्डत सामना आपल्या दिशेने फिरवला. दोघांनी 58 धावांची भागी रचत आफ्रिकेला विजयी ट्रकवर आणले. स्टब्जचा त्रिफळा अक्षर पटेलने उडवत सामन्यात जान आणली आणि त्यातच अर्शदीपने डिकॉकला बाद करून सामन्याची चुरस वाढवली.

क्लासनने सामना फिरवला होता…

क्लासन आणि डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेला विजयासमीप नेणारा खेळ करत हिंदुस्थानी संघाची चिंता वाढवली. त्यातच अक्षर पटेलच्या 15 व्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार खेचत क्लासनने 24 धावा चोपत जेतेपदच आफ्रिकेच्या दिशेने खेचून नेले. शेवटच्या 30 चेंडूंत 30 धावांचे तुटपुंज्या आव्हानामुळे सामना जवळजवळ संपल्यातच जमा झाला होता. पण 17 व्या षटकात पंडय़ाने क्लासनची क्लासिक विकेट काढत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या, पुढे बुमराने यानसनचा त्रिफळा उडवत आपल्या 2 षटकांत केवळ 6 धावा देत सामन्याचा सारा नूरच पालटवला. त्याच्या भेदक माऱयामुळे 30 चेंडूंत 30 धावा दूर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला 6 चेंडूंत 16 धावा अशा स्थितीत आणले. मग शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर सूर्याने मिलरच्या सीमारेषेवर टिपलेल्या अद्भुत झेलाने हिंदुस्थानचे 17 वर्षानंतरचे टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद निश्चित केले आणि आपल्या सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने आपल्या दुसऱया टी-20 वर्ल्ड कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

‘आयसीसी’ ट्रॉफीच्या जेतेपदाचा षटकार

हिंदुस्थानने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983चा वर्ल्ड कप जिंकून हिंदुस्थानी क्रिकेटचा पहिला सोनेरी अध्याय लिहिला. त्यानंतर तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानला ‘आयसीसी’चे जेतेपद मिळाले होते. 2002मध्ये श्रीलंकेसोबत हिंदुस्थानने ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’वर नाव कोरले होते. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ची फायनल पावसात वाहून गेल्याने उभय संघाना संयुक्त जेतेपद बहाल करण्यात आले होते. मग 2003च्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव होऊन सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानला उपविजेतेपद घेऊन मायदेशी परतावे लागले होते. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली  हिंदुस्थानने 2007मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडविला. मग हिंदुस्थानने चारच वर्षांनंतर मायदेशातील वन डे वर्ल्ड कप नावावर करण्याचा पराक्रम केला. 2011च्या या वनडे वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने श्रीलंकेचा पराभव करीत झळाळत्या करंडकावर नाव कोरले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर हिंदुस्थानने नाव कोरले. त्यावेळीही संघाची धुरा एमएस धोनी याच्या खांद्यावर होती. मग 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार पत्करावी लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. धोनीच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघाने वन डे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलेय. हिंदुस्थानकडे दोन वन डे वर्ल्ड कप, एक टी-20 वर्ल्ड कप आणि दोन चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद होते. मात्र, 2013नंतर हिंदुस्थानी संघाला आयसीसी चषकावर नाव कोरता आलेले नव्हते. गतवर्षी मायदेशात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागल्याने टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

हिंदुस्थानला तिहेरी धक्का

विराट कोहलीने पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकल्यानंतर केशव महाराजच्या दुसऱया षटकात हिंदुस्थानला तीन चेंडूंत दोन हादरे बसले. हिंदुस्थानला धुवांधार सलामी देणाऱया रोहितने महाराजला सलग दोन चौकार ठोकले, तेव्हा स्टेडियमचा आवाज 120 डेसिबल्सच्या पुढे गेला होता, पण पुढचा चेंडू निर्धाव आणि मग चौथ्या चेंडूवर महाराजने रोहितला बाद केले आणि क्षणात मैदानात शांतता पसरली. पुढे पंतकडून अपेक्षा होती, पण तो शून्यावर बाद झाला. एकाच षटकात दोन विकेट गमावल्यावर हिंदुस्थान संकटात सापडला होता. तेव्हा सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा होत्या, पण तोसुद्धा अपयशी ठरला. आतापर्यंत हिंदुस्थानच्या फलंदाजीत झंझावाती फलंदाजी करणारे तिन्ही फलंदाज  34  धावांतच बाद झाल्याने हिंदुस्थान प्रचंड दबावाखाली खेळू लागला.

विराट खेळला, पण

पॉवर प्लेमध्ये तीन धक्के बसल्यानंतर हिंदुस्थानची फलंदाजी अक्षरशः कोमात गेली. त्यामुळे अक्षर पटेलला बढती देण्यात आली. त्याने विराटच्या साथीने संघाच्या डावाला गती देण्याचा प्रयत्न केला, पण दुसरीकडे विराटने एकेरी-दुहेरी धावांवरच जोर दिला. त्यामुळे हिंदुस्थानला पहिल्या दहा षटकांत अपेक्षित मजल मारता आली नाही. मात्र अक्षरने चार खणखणीत षटकार खेचत संघाला शंभरी ओलांडून दिली. अक्षर दुर्दैवीरीत्या डिकॉकच्या थेट चेंडूफेकीवर बाद झाला. या विकेटनंतर धावसंख्येला वेग देण्यासाठी शिवम दुबे मैदानात उतरला आणि त्याने धावाही काढल्या. पण एकेरी-दुहेरी धावांवरच भर देणाऱया कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये चक्क 48 व्या चेंडूंवर पन्नाशी गाठली आणि तो शेवटच्या क्षणी तुटून पडला. त्याने शेवटच्या 10 चेंडूंत 26 धावा फटकावत हिंदुस्थानला 200 धावांचे स्वप्न दाखवले, पण त्यातच तो बाद झाला. पुढे आफ्रिकन गोलंदाजांनी हिंदुस्थानला 180 पर्यंतही पोहचू दिले नाही. शेवटच्या षटकांत नॉर्कियाने केवळ 9 धावा दिल्या आणि  2 विकेटही टिपल्या. 190-200 धावांच्या खेळपट्टीवर हिंदुस्थान 176 धावांच करू शकला. महाराज आणि नॉर्किया या दोघांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपल्या.

टी-20 वर्ल्ड कपमधील विजेते अन् उपविजेते

साल       विजेते         उपविजेते

2007     हिंदुस्थान    पाकिस्तान

2009     पाकिस्तान श्रीलंका

2010     इंग्लंड         ऑस्ट्रेलिया

2012     विंडीज        श्रीलंका

2014     श्रीलंका       हिंदुस्थान

2016     विंडीज        इंग्लंड

2021     ऑस्ट्रेलिया न्यूझीलड

2022     इंग्लंड         पाकिस्तान

2024     हिंदुस्थान    . आफ्रिका