पावसामुळे एक सामना रद्द झाल्यामुळे गुणतालिकेत तळाला असलेल्या इंग्लंडने ओमानचा 47 धावांत खुर्दा पाडल्यानंतर विजयी लक्ष्य 3.1 षटकांतच गाठले आणि टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील 101 चेंडू राखून विजय मिळवत महाविजयाची नोंद केली. ‘ब’ गटातून सुपर एटचे आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडला नामिबियाविरुद्धही प्रचंड मोठय़ा विजयाची गरज लागणार आहे.
‘अ’ गटातून गत उपविजेत्या पाकिस्तानचे आव्हान संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच जगज्जेत्या इंग्लंडवरही साखळीतच बाद होण्याचे संकट ओढावले आहे. इंग्लंडचे भवितव्य ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड या लढतीवर अवलंबून असल्यामुळे त्या लढतीपूर्वी नामिबियाविरुद्ध महाविजय नोंदवत आपला नेट रनरेट वाढवण्याचे आव्हान जगज्जेत्यांसमोर आहे.
आज स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना इंग्लंडने टॉस जिंकला आणि ओमानला फलंदाजी दिली. जोफ्रा आर्चर-मार्क वूड यांनी प्रत्येकी 3 आणि आदिल राशीदने 11 धावांत 4 विकेट घेत ओमानचा 47 धावांतच खेळ खल्लास केला. विशेष म्हणजे ओमानच्या डावात शोएब खानच (11) दोनअंकी धावसंख्या करू शकला. ओमानचा डाव 13.2 षटकांत 47 धावांवर संपला आणि मग इंग्लंडने आपले 48 धावांची विजयी लक्ष्य 3.1 म्हणजेच 19 चेंडूंत गाठले. फिल सॉल्ट (12) डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर बिलाल खानला षटकार ठोकला आणि तिसऱया चेंडूवर त्रिफळाचीत झाला. मग विल जॅक्सही बाद झाला. त्यानंतर जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टॉने 4, 4, 0, 4, 4, 6, 4, 4 असे आठ चेंडूंत 30 धावा चोपत 19 चेंडूंत विजयी लक्ष्य साकारले. बटलरने 8 चेंडूंत 24 धावा ठोकल्या. इंग्लंडने 101 चेंडू राखून विजय मिळवताना 2014 साली श्रीलंकेने नेदरलॅण्ड्सचा 90 चेंडू राखून केलेल्या पराभवाचा विक्रम मागे टाकला.