29 जूनला दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 क्रिकेटचे जग जिंकणाऱया कर्णधार रोहित शर्माने आज क्रिकेटप्रेमींच्या अलोट आणि अफाट स्वागताने भारावल्यानंतर हा विजय हिंदुस्थानी संघाचा नव्हे तर तमाम हिंदुस्थानींचा असल्याचे गौरवोद्गार काढत त्यांचीही मने जिंकण्याचा पराक्रम केला.
मरीन ड्राइव्ह ते वानखेडेपर्यंतची अभूतपूर्व विजययात्रा केल्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या 33 हजार क्रिकेटप्रेमींचे रोहितने आभार मानले. तो आपल्या भाषणात म्हणाला, ‘टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची उत्सुकता आम्हाला जितकी होती, त्याच्या पैकपटीने आतुरता अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना लागली होती. त्यामुळे आम्ही आमचे ध्येय साकारले असले तरी हा विजय आमच्या संघाचा नव्हे तर तमाम हिंदुस्थानींचा आहे. हा कप त्यांचाही आहे. 29 जूनला बार्बाडोसमध्ये आपणा सर्वांचे स्वप्न सत्यात उतरले. आमच्याप्रमाणेच चाहत्यांच्या चेहऱयावरही आनंद ओसंडून वाहतोय. ही स्पेशल टीम इंडिया असून, या संघाचं नेतृत्व करायला मला लाभलं हे मी माझं भाग्य समजतो. संघातील प्रत्येक खेळाडूप्रमाणेच आमचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, कोचिंग टीम या सर्वांचे या जगज्जेतेपदामध्ये बहुमोल योगदान आहे, असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.
हे कठोर मेहनतीचे फळ
‘टीम इंडियातील खेळाडू माझं कटुंब आहे. या शिलेदारांनी जे केलं ते अतुलनीय होय. हा वर्ल्ड कप म्हणजे तुम्हा सर्वांच्या कठोर मेहनतीचे फळ आहे. आता हे सर्व प्रेम मी खूप खूप मिस करेन. आम्ही मायदेशात पाऊल ठेवल्यापासून क्रिकेटप्रेमींकडून जे प्रेम मिळत आहे, त्याचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. क्रिकेट आज जे काही आहे, ते चाहत्यांचे उदंड प्रेम आणि त्यांच्या समर्थनामुळेच होय.’
n राहुल द्रविड, प्रशिक्षक
आता जाणले या विजयाचे मोल
‘2007 व 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला तेव्हा वरिष्ठ खेळाडू खूप रडले होते, मात्र मी त्या भावनिक प्रसंगात सहभागी होऊ शकलो नव्हतो. तेव्हा मी 22 वर्षांचा असेन. ते इतके का भावनिक होताहेत हेच मला कळत नव्हते. मात्र, आता आम्ही स्वतः वरिष्ठ खेळाडू झाल्यानंतर आम्हाला त्या भावनांचे मोल कळले आहे. माझ्या नेतृत्वात व रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेक ट्रॉफी जिंकल्या, मात्र हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आम्ही खुप उत्सूक होतो. 15 वर्षांच्या कारकीर्दीत मी रोहितला प्रथमच इतपं भावुक होताना बघितलं. बार्बाडोसहून कधी एकदाचे मायदेशात परततोय असे आम्हाला झाले होते. मायदेशात चाहत्यांच्या या उदंड प्रेमाने अक्षरशः भारावून गेलोय.’
n विराट कोहली