हिंदुस्थानच फायनल खेळावा; अमेरिकन-कॅरेबियन्स चाहत्यांची इच्छा

टी-20 वर्ल्ड कप अमेरिकाकॅरेबियन बेटांवर सुरू होत असला तरी तिथे हवा फक्त टीम इंडियाचीच आहे. क्रिकेटचा धमाका अमेरिकेत करण्यासाठी आयसीसीसह दोन्ही आयोजकांनीही कंबर कसलीय. स्पर्धेला यशाचा टीळा लागण्यासाठी हिंदुस्थानच जगज्जेतेपदाची लढत खेळावा अशी तमाम अमेरिकन आणि कॅरेबियन्सची मनापासून इच्छा आहे. याच बरोबर क्रिकेटच्या दिग्गजांनीही आपल्या टॉप फोर संघात हिंदुस्थानचे नाव कायम ठेवल्यामुळे सर्वांच्याच ध्यानीमनी टीम इंडियाच वसली आहे.

क्रिकेटच्या नभांगणात टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबरोबर अमेरिकेचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतही क्रिकेटची बॅटिंग सुरू व्हावी म्हणून गेली दीड-दोन दशके हिंदुस्थानी मंडळीच पुढाकार घेत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे आणि टी-20 वर्ल्ड कपचेही दिमाखदार आयोजन करायचे असेल तर त्याला टीम इंडियाचीही साथ शेवटपर्यंत असणे गरजेचे आहे. टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम आणि हिंदुस्थानी संघाची जबरदस्त कामगिरी पाहता वर्ल्ड कप हमारा है… असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला सर्वात बलाढय़ संघ मानले जाते. यंदाही तो दावेदार आहे, पण हिंदुस्थानी संघही त्याच्यापेक्षा किंचितही कमी नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि नंतर आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप या दोन्ही स्पर्धांमध्ये हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच अंतिम सामना रंगला आणि बाजी ऑस्ट्रेलियाने मारली. आता सलग तिसऱयांदा हे दोन्ही दिग्गज अंतिम फेरी गाठतील असा अंदाज आहे. मात्र जगज्जेतेपद हिंदुस्थानने जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाची मालिका संपवावी, अशीच साऱयांची इच्छा आहे. गेली 12 वर्षे हिंदुस्थान आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेला नाही. एवढेच नव्हे तर टी-20 चे 2007 साली झालेली पहिली स्पर्धा जिंकल्यानंतर गेल्या सात स्पर्धांमध्ये हिंदुस्थानची झोळी रिकामीच राहिली आहे. ती यावेळी भरावी, ही अपेक्षा आहे.

काहीही घडू शकते

उपांत्य फेरीत धडक मारणाऱया संभाव्य संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, ंिहदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका ही पहिली पसंती आहे. पण टी-20 चा वेगवान खेळ आणि आयपीएलमध्ये झालेला खेळ पाहता कोणताही संघ काहीही करू शकतो. या यादीत वेस्ट इंडीज, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, अफगाणिस्तान या संघांना कमी लेखून चालणार नाही. एखादे षटकही सामना फिरवू शकतो, याचा वारंवार प्रत्यय आला आहे. त्यामुळे आयपीएलचा झंझावात वर्ल्ड कपमध्येही दिसणार, हे निश्चित आहे.

दिग्गजांची पहिली पसंती हिंदुस्थानच

वर्ल्ड कपचा धमाका सुरू होईलच, पण त्याआधी सर्वच दिग्गजांनी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत. सर्वांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ उपांत्य फेरी खेळतील. तर काहींनी टॉप पह्रमध्ये वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान या संघांनाही स्थान दिले आहे.

 वेस्ट इंडीजला वर्ल्ड कप संस्मरणीय करायचाय

2007 साली वेस्ट इंडीजच्या पॅरेबियन बेटांवर प्रथमच वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड कप आयोजनाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले खरे, पण ते त्यांना पेलता आले नाही. त्याचे सर्वात मोठे कारण होते हिंदुस्थानी संघाचे अपयश. हिंदुस्थानचा बलाढय़ संघ साखळीतच बाद झाल्याने वेस्ट इंडीजला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यातच यजमान संघही सुपर-एटमध्ये बाद झाला. या स्पर्धेचा सारा डोलारा हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींवर होता आणि हिंदुस्थानचे वर्ल्ड कप दहा दिवसांतच संपल्यामुळे विंडीजचा अक्षरशः बाजार उठला होता, मात्र यावेळी त्यांना ते अपयश धुऊन काढायचे आहे. हिंदुस्थानचा संघ सुपर-एटमध्ये पोहोचणे निश्चित असल्यामुळे मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी चाहते पॅरेबियन बेटांवर येतील, असा त्यांना ठाम विश्वास आहे. तसेच स्पर्धेतील हिंदुस्थानच्या लढती सर्व हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 8 वाजता रंगणार असल्यामुळे स्पर्धेला प्रचंड टीआरपी मिळण्याचीही आयसीसीने व्यवस्था केली आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप कोणत्याही स्थितीत संस्मरणीय करण्यासाठी आयोजक म्हणून विंडीज मंडळ आणि संघ म्हणून वेस्ट इंडीज संघ तयारीला लागलेत. त्यांच्यासाठी हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज ही ड्रीम फायनल आहे. असं घडलं तर ते सोन्याहून पिवळे असेल.