हिंदुस्थानच्या महाविजयाचा आज छोटासा जल्लोष! अवघ्या एक कि.मी.च्या अंतरात उरकणार जगज्जेत्यांची विजययात्रा

17 वर्षांपूर्वी हिंदुस्थानी संघाने टी-20 वर्ल्ड कपचे पहिलेवहिले जगज्जेतेपद पटकावले होते तेव्हा महेंद्रसिंग धोनी आणि सेनेच्या स्वागतासाठी अवघी मुंबई रस्त्यावर उतरली होती. तब्बल 24 किमीच्या विजययात्रेत हिंदुस्थानी संघ विजयरथात (खुली बस) बसून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वानखेडे स्टेडियमला पोहोचला होता. लाखो क्रिकेटप्रेमी तहानभूक विसरून तब्बल सात तास बसच्या मागे धावत होते. त्यादिवशी पावसानेही जगज्जेत्या हिंदुस्थानी संघावर बरसून स्वागत केले होते. उद्या गुरुवारी हिंदुस्थानी संघ जगज्जेतेपदासह मुंबईत परतणार असला तरी या महाविजयाची अवघी एक कि.मी. अंतराची छोटीशी आणि थोडक्यात उरकणारी शोभायात्रा काढली जाणार आहे. महाआनंदाच्या या छोटय़ाशा जल्लोषामुळे क्रिकेटप्रेमी मुंबईकर नाराज झाले आहेत.

जो आनंद 2007 साली झाला होता, तसाच आनंद आताही हिंदुस्थानी संघाला आणि अब्जावधी हिंदुस्थानींना झालाय. गेल्या वर्षभरात हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाने आधी कसोटीच्या वर्ल्ड कपमध्ये धूळ चारली तर नंतर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये जगज्जेतेपदापासून दूर ठेवले. मग विंडीजमध्ये हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारत जगज्जेतेपदाच्या लढतीची अनोखी हॅटट्रिक साजरी केली. दोन स्पर्धांतील अपयशानंतर टी-20 वर्ल्ड कपमधील महाविजयाने हिंदुस्थानचा आनंद द्विगुणीत केला होता. या विजयाचा जल्लोष हिंदुस्थानात दिमाखात साजरे करील, अशी अपेक्षा होती. पण बार्बाडोसमध्ये आलेल्या वादळामुळे हिंदुस्थानी संघाचे मायदेशी परतणे लांबणीवर पडले आणि जल्लोषाबाबतची बीसीसीआयची उत्सुकताही कमी झाली. मात्र हिंदुस्थानी चाहत्यांनीच 2007 च्या जल्लोषाची आठवण करून दिल्यामुळे बीसीसीआय अवघी एक किमीची विजय यात्रा काढणार असल्याचे समोर आले आहे. विजयी यात्रेनंतर जगज्जेत्या खेळाडूंना 125कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हिंदुस्थानी संघासाठी हे जगज्जेतेपद मोठा धमाका असला तरी जल्लोष छोटय़ा रूपात उरकणे हे पटलेले नाही. खुद्द रोहित शर्मानेच विजय यात्रेद्वारे तुमच्यासोबत आनंद व्यक्त करायचाय, असे ट्विट केले होते. पण हा एक किमीचा आनंद किमान पाच किमीचा तरी असायला हवा होता, अशी सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींची भावना आहे.

मोठय़ा विजययात्रेचा प्रवास छोटा का?

दोन पराभवानंतर मिळवलेल्या विजयाची चव काही औरच आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघाची विजययात्रा भव्य आणि दिव्य काढली जाईल, अशी साऱयांची अपेक्षा होती. पण बार्बाडोसमध्ये आलेले वादळ आणि त्यानंतर झालेला दोन दिवसांचा विलंब यामुळे ही विजय यात्रा टी-20 च्या फॉरमॅटप्रमाणे शॉर्ट आणि स्वीट केल्याचे बोलले जात आहे. पण हे कारण पटेनासे आहे. त्यापेक्षा उद्या होणारी यात्रा शनिवारी किंवा रविवारी काढून बीसीसीआयला विजयाचा हा आनंद आणखी द्विगुणीत करता आला असता. आता एक किमीची यात्रा सुरू होऊन तासातच संपेल. त्यामुळे या यात्रेत ना लाखांची गर्दी दिसेल ना जगज्जेतेपदाचा तो संस्मरणीय आनंद.

जिव्हारी पराभव अन् जगज्जेतेपदाचा आनंद

शनिवारी थरारक संघर्षात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत हिंदुस्थानने आपल्या जगज्जेतेपदांचा दुष्काळ संपवताना 13 वर्षांनंतर जगज्जेतेपद तर 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कपचे दुसऱयांदा जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. 17 वर्षांपूर्वी आयसीसी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. हा पराभव कोटय़वधी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाच्या सहा महिन्यांनंतरच हिंदुस्थानने टी-20 क्रिकेटचे पहिलेवहिले जेतेपद अत्यंत रोमहर्षक लढतीनंतर काबीज करत हिंदुस्थानी चाहत्यांना जगज्जेतेपदाची अनोखी भेट दिली होती. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही असेच काहीसे साम्य होते. गेल्या वर्षी म्हणजे सात महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी संघ आयसीसी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचे जेतेपदाचे स्वप्न भंग केले. हा पराभवही सर्वांच्या जिव्हारी लागला होता. मात्र आता रोहित शर्माच्या संघाने पराभवाच्या त्या जखमेवर जगज्जेतेपदाचे मलम लावले.

असा असेल कार्यक्रम

n सकाळी 6 वा. हिंदुस्थानी संघाचे विशेष विमानाने दिल्ली विमानतळावर आगमन

n सकाळी 6.30 वा. हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये आगमन

n सकाळी 11 वा. पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदींची भेट

n दुपारी 2 वा. दिल्लीहून मुंबईला रवाना

n सायंकाळी 4 वा. मुंबई विमानतळावर आगमन

n सायंकाळी 5 वा. नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम येथे खुल्या बसमधून विजययात्रा

n सायंकाळी 6 वा. हिंदुस्थानी संघाचा बीसीसीआयच्या हस्ते सत्कार