एमसीए कोल्टस आणि पारसी जिमखाना यांच्यात जेतेपदासाठी झुंज

आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील जेतेपदासाठी एमसीए कोल्टस आणि पारसी जिमखाना संघ एकमेकांशी भिडतील. उपांत्य फेरीत एमसीए कोल्ट्सने पी.जे. हिंदू जिमखान्यावर 4 विकेट राखून मात केली. दुसऱ्या लढतीत पारसी जिमखान्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर (सीसीआय) 6 विकेट राखून विजय मिळवला.

बॉम्बे जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात जय बिस्ताच्या  धडाकेबाज शतकाच्या जोरावर पी.जे. हिंदू जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 183 धावा केल्या. मात्र एमसीए कोल्ट्सने 19.4 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. दिव्यांश सक्सेनाने 41 चेंडूंत 62 धावांची करताना त्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. सुवेद पारकरने 29 धावा काढत त्याला चांगली साथ दिली.

दुसऱ्या सामन्यात सीसीआयचे 204 धावांचे आव्हान पारसी जिमखान्याने 19.3 षटकांत 4 विकेट राखून पार केले. त्यात ईशान मुलचंदानीने सर्वाधिक 74 धावा केल्या.