सीरियात 27 नोव्हेंबरपासून लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता चांगलाच चिघळला आहे. लष्करावर मात करत बंडखोर गटाने सीरियातील आणखी एक शहर ताब्यात घेतले आहे. बंडखोरांनी 1 डिसेंबर रोजी सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर अलेप्पोवर ताबा मिळवला होता. बंडखोरांनी अलेप्पोमधील हमाला ताब्यात घेतल्याने सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी लष्कराने आता शहरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हमाला ताब्यात घेण्यासाठी बंडखोर सैनिकांची लष्कराशी गेल्या तीन दिवसांपासून झुंज सुरू होती. संरक्षण रेषा तोडण्यासाठी बंडखोरांनी आत्मघाती हल्ले सुरू केल्याचा आरोप लष्कराने केला आहे. या काळात बंडखोरांशी लढताना अनेक जवान शहीद झाले आहेत, असेही सांगितले गेले आहे. हमा हे सीरियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. 2011 मध्ये सीरीयात झालेल्या गृहयुद्धातही हमाला बंडखोरांच्या ताब्यात गेले नव्हते.
कुर्दिश सैनिकांनी अलेप्पोचा काही भागही ताब्यात घेतला आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत असदच्या सैन्याच्या ताब्यात असलेला काही भाग आता कुर्दिश सैनिकांच्या ताब्यात गेला आहे. हे कुर्दिश लढवय्ये बंडखोर गटाच्या विरोधातही लढत आहेत. त्यामुळे बंडखोर गटांनी अलेप्पोमधील कुर्दिश सैनिकांच्या ठाण्यांवर हल्ले केले आहेत.