‘सिंफनी’ संस्थेचे आधारस्तंभ श्रीकांत कुलकर्णी यांचे निधन

मनोरंजन क्षेत्रातील ‘सिंफनी’ संस्थेचे आधारस्तंभ श्रीकांत कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ईएसआयसी या केंद्र सरकारच्या विभागामध्ये 30 हून अधिक वर्षे कार्यरत होते. गेली आठ वर्षे स्वरमुग्धा आर्ट्स या संस्थेतर्फे श्रीकांत कुलकर्णी आणि कृष्णकुमार गावंड यांनी शंकर जयकिशन यांच्या कारकिर्दीसंबंधी ‘तुम्हे याद करते करते’ या कार्यक्रमाचे 40 हून अधिक प्रयोग सादर केले आहेत.

दादरच्या छबिलदास शाळेचे माजी विद्यार्थी वसंत खेर, कृष्णकुमार गावंड आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी 1976 साली संगीतकार शंकर-जयकिशन यांच्यावरील प्रचंड प्रेमाखातर ‘सिंफनी’ या संस्थेची स्थापना केली. ‘यादे शंकर जयकिशन’ या कार्यक्रमाने शुभारंभ झाला. त्यावेळी संगीतकार शंकर उपस्थित होते. त्यानंतर गायक किरण शेंबेकरही ‘सिंफनी’ या संस्थेशी जोडले गेले आणि या चार शिलेदारांनी सुपरहिट आणि सर्वात गाजलेल्या ‘झपाटा’ कार्यक्रमाची निर्मिती केली. त्याचे आजपर्यंत 4000 हून अधिक प्रयोग सादर झालेले आहेत.