उर्विल पटेलचे 28 चेंडूंत शतक; टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा हिंदुस्थानी फलंदाज

ऋषभ पंत 27 कोटींच्या किमतीसह नुकताच आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला. मात्र, याच लिलावात किंमतच न लाभलेल्या (अनसोल्ड) गुजरातच्या उर्विल पटेलने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत 28 चेंडूंत वेगवान शतक ठोकून पंतचा विक्रम मोडला. ऋषभ पंतने दिल्ली संघाकडून खेळताना 2018मध्ये याच स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध32 चेंडूंत शतक ठोकले होते. सहा वर्षांनंतर त्याचा हा विक्रम एका यष्टिरक्षक फलंदाजानेच मोडीत काढला.

क्रिकेट विश्वातील दुसरे वेगवान टी-20 शतक

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या उर्विल पटेलने त्रिपुराविरुद्ध अवघ्या 28 चेंडूंत टी-20 शतक झळकाकले आहे. त्याच्या या खेळीत 12 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. 322.86च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 35 चेंडूंत 113 धावा फटकाविल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर गुजरातने त्रिपुराचा 8 फलंदाज आणि 58 चेंडू राखून पराभव केला. त्रिपुराने 20 षटकांत 8 बाद 155 धावसंख्या उभारली होती. मात्र, गुजरातने 10.2 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 156 धावा करून विजय मिळविला. उर्विलने 27 चेंडूंत शतक पूर्ण केलं असलं, तरी तो टी-20 मधील जगातील सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण सध्या हा विक्रम इस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे. साहिलने याच वर्षी सायप्रसविरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूंत टी-20 शतक झळकावले होते. या यादीत ख्रिस गेल तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 2013च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध30 चेंडूंत शतक ठोकले होते.

उर्विलचे लिस्ट ‘ए’मध्ये दुसरे जलद शतक

उर्विल पटेलने वर्षभरापूर्वी याच तारखेला आणखी एक मोठी कामगिरी केली होती. त्याने लिस्ट ‘ए’ मध्ये दुसरे सर्वात जलद शतक ठोकले होते. विजय हजारे ट्रॉफीत त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध41 चेंडूंत शतक झळकावले होते. या बाबतीत टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण अजूनही पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2009-10च्या स्पर्धेत 40 चेंडूंत शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.

टी-20 क्रिकेटमधील वेगवान शतकवीर

n 27 चेंडू – साहिल चौहान (एस्टोनिया विरुद्धसायप्रस, 2024),

n 28 चेंडू – उर्विल पटेल (गुजरात विरुद्धत्रिपुरा, 2024),

n 30 चेंडू – ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धपुणे कॉरियर्स, 2013),

n 32 चेंडू – ऋषभ पंत (दिल्ली कि. हिमाचल प्रदेश 2018)