सिडनी कसोटीतून मला वगळण्यात आलेले नाहीये. माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या. त्यामुळेच मी स्वतः संघहितासाठी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या निवृत्तीचा कुठलाही विचार माझ्या मनात घोळत नाहीये, असा खुलासा करीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ‘मी पुन्हा येईन’ असा इशारा देत क्रिकेट वर्तुळातील त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
सिडनी कसोटीतील दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने उपाहाराच्या वेळेला ‘स्टार स्पोर्ट्स’वर आपली ‘मन की बात’ सांगितली. तो म्हणाला, ‘सध्या माझ्या बॅटमधून धावा निघत नाहीये. त्यामुळे संघहितासाठी मी स्वतः सिडनी कसोटीतून माघार घेतो, अशी चर्चा मी संघाचे प्रशिक्षक व संघनिवड समितीच्या सदस्यांशी केली, मात्र आता मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय, अशा वावड्या कोणी उठवू नये. मी फॉर्ममध्ये नाही म्हणजे माझ्या बॅटमधील धावांचा ओघ आटला असा होत नाही. मी आणखी मेहनत घेईन. पुन्हा फॉर्मात येईल अन् स्वतःला सिद्ध करेन,’ असेही रोहित शर्माने स्पष्ट केले.
‘मी दोन मुलांचा बाप आहे. मलाही थोडफार कळतं. त्यामुळे कधी निवृत्त व्हायचं, संघाचं नेतृत्व करायचं की नाही? हे ठरविण्याची समज मला नक्कीच आहे. बाहेर लॅपटॉप, पेन, कागद घेऊन बसलेले लोक माझ्या निवृत्तीचा निर्णय घेऊ शकत नाहीत,’ असेही कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले.