राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नव्या नियुक्त्यांबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे राज्य सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाचा निकाल येण्याआधीच नव्या नियुक्त्या करून मिंधे सरकारने कोर्टालाही गंडवले आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी सात सदस्यांचा शपथविधीही घाईघाईत पार पाडला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले मिंधे गटाचे हेमंत पाटील, शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मनीषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या चित्रा वाघ यांनी आज राज्यपाल नामनिर्देशीत सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांचाही शपथविधी झाला. शिवसेनेतून फुटून मिंधे गटात प्रवेश केलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या सात सदस्यांना शपथ दिली. विधान भवन येथील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
नियम, कायदे धाब्यावर
राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. सहकार, समाजसेवा, साहित्य, विज्ञान, क्रीडा, पत्रकारिता अशा क्षेत्रातील मान्यवरांना नामनिर्देशित करून विधान परिषदेवर पाठवावे अशी कायद्यात तरतूद आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा ही यामागची अपेक्षा आहे. मात्र, मिंधे सरकारने जाताजाता नियम आणि कायदे धाब्यावर बसवून राजकीय सोयीच्या नियुक्त्या विधान परिषदेवर केल्या.