जिद्द – चिक्कीची चव लय न्यारी

>> स्वप्नील साळसकर

मुंबई-पुण्याकडच्या चाकरमान्यांमध्ये सिंधुदुर्गातली खोबरा चिक्की लोकप्रिय आहे. या चविष्ट आणि रुचकर खोबरा चिक्कीची चव चाखण्यासाठी सिंधुदुर्गात गेलात तर मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल बालमवाडी फाट्यावरून पोखरण गावाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कुसबे खालचीवाडी या ठिकाणी लाड कुटुंबीयांनी  बनवलेली सर्व उत्पादने उपलब्ध आहेत. सिव्हिल इंजिनीअर/उद्योजक अक्षय लाड त्याच्या जिद्दीची ही कहाणी…

उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न धावता सिंधुदुर्गात व्यवसाय उभा करून शहरातील एका खासगी कंपनीतून पगार मिळेल एवढे उत्पन्न निर्माण करण्याची जिद्द काही उच्चशिक्षित तरुणांमध्ये दिसून येते. असेच एक उदाहरण म्हणजे कुडाळ तालुक्यातील कुसबे खालचीवाडी येथील सिव्हिल इंजिनीअर अक्षय लाड. अद्विक अॅग्रो प्रॉडक्ट, लाड सोबती ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी बनवलेली मालवणी गूळ-खोबरा चिक्कीची गोडी दूरवर पसरली आहे.

मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधून सिव्हिल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेल्या अक्षय याने सुरुवातीला गोवा, चिपी विमानतळावर एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर काम थांबले. नवीन कामाच्या शोधात तो बाहेर पडला. मुंबईसारख्या शहरात काही दिवस नोकरी करत असतानाच कोरोनाचे संकट उभे ठाकले. सगळ्या कंपन्या, उद्योग, व्यवसायांना याची झळ बसली. त्यानंतर अक्षय याने गावी येण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात एक-दोन वर्षे काहीतरी हातपाय हलवायचे आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावायचा या हेतूने मग त्याने मालवण तालुक्यातून नारळ आणायचे व आपल्या गावात त्याची पी करायची हा व्यवसाय निवडला. त्यात त्याला चांगला फायदाही झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अक्षयला शहरातील

एक-दोन कंपन्यांकडून बोलावणेही आले. मात्र नोकरी म्हटली की मानसिक ताणतणाव, वरिष्ठांची बोलणी सहन करत काम करण्यापेक्षा स्वतच लहानसा व्यवसाय करत गावची शेतीवाडी, पशुधनाचा सांभाळ करत सुशेगात जीवन जगायचे म्हणत अक्षयने गावीच राहण्याचा निर्णय घेतला आणि मग जिद्द अजूनच वाढली.

नारळापासून वेगळे काहीतरी तयार करायचे या हेतूने मग शेंगदाणा, गूळ, खोबरे वापरून चिक्की तयार करण्याचा पर्याय त्याच्यासमोर उभा राहिला. व्यवसायाची सावध आणि छोटी सुरुवात करताना मग कुटुंबाच्या मदतीने अक्षयने या व्यवसायाचा पाया रचला. उद्योगासाठी लागणाऱया मशिनरी त्याने कोल्हापूरवरून मागवल्या. या खोबरा चिक्कीसाठी नारळ मोठय़ा प्रमाणात लागत असल्यामुळे ते केरळवरून मागविले जातात. घरातील सदस्य तसेच आजूबाजूच्या महिला यांना एकत्र करत हळूहळू अक्षय लाड याने उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याच्या या स्वभावामुळे स्थानिक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला. अक्षय याने जिह्यातील बाजारपेठांचा अंदाज घेत मग स्थानिक दुकानदारांशी संपर्क साधला. प्रथम साध्या पॅकिंगने हे उत्पादन पीसाठी उपलब्ध करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र याच्या सर्व नोंदी तयार करत मग आकर्षक कंटेनर, डब्यामध्ये पॅकिंग करत हे चवदार पदार्थ हळूहळू जिल्हय़ाबाहेरही जाऊ लागले.

हळदीचे लोणचे 

गूळ-खोबरा चिक्की उत्पादनात बऱयापैकी यशस्वी ठरल्यानंतर अक्षय याने प्रायोगिक तत्त्वावर आयुर्वेदिक हळदीचे लोणचे तयार करण्यास सुरुवात केली. याही उत्पादनाला अजून मागणी वाढेल, असा विश्वास अक्षय याने व्यक्त केला आहे.

टाकाऊ करवंटीतूनही मोबदला 

शिल्लक राहिलेली करवंटी जाळून न टाकता एकत्रितरीत्या साठवणूक करून त्यातील मोठय़ा आणि विशिष्ट आकाराच्या करवंटय़ा विविध शोभिवंत बनवल्या जातात. तर उरलेल्या करवंटय़ा किलोच्या दराने कोळसा तयार करण्यासाठी केरळमध्ये पाठवल्या जातात. यातूनही थोडाफार मोबदला मिळत असल्याचे अक्षयने सांगितले.

[email protected]