परीक्षण – एका कलाप्रवासाची अभिव्यक्ती

>> स्वप्नील जोशी

 ‘इरफान खान’ या बहुआयामी, प्रतिभावान अभिनेत्याचा प्रवास नक्की कसा आहे, याबाबतचे कुतूहल प्रत्येक सिनेरसिकाला आहे. अल्पकाळातच आपली कारकीर्द गाजवणारा आणि आयुष्याच्या रंगमंचावरून लगेचच एक्झिट घेणारा हा अभिनेता नक्की कोण होता? त्याची जीवनविषयक मूल्ये काय होती? ‘कुछ और करते है!’ असं सांगणाऱया इरफान खानला नक्की कशाचा शोध घ्यायचा होता? मुंबई या मायानगरीत येण्यापूर्वी इरफान कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेतून येतो? याचाही प्रामाणिकपणे, प्रांजळपणे शोध घेण्याचा प्रयत्न लेखक असिम छाब्रा यांनी केला आहे. मूळ इंग्रजी असलेल्या साहित्यकृतीचा अनुवाद नीता कुलकर्णी यांनी केला आहे.

राजस्थानमध्ये एका लहानशा गावात वाढलेला इरफान आपल्या कुटुंबातील आणि सभोवतालच्या भावविश्वात हरखून गेला होता. या तरुण मुलात एक कलाकारही दडलेला आहे हे त्यावेळी खचितच कुणाच्या निदर्शनास आले असावे. पण आसऱयाला फांदी गवसली आणि हा ध्येयवेडा तरुण आपल्या स्वप्नांच्या दिशेने धावू लागला. या पुस्तकाचे शीर्षकच मुळी ‘इरफान खान – स्वप्नं पाहणाऱया एका स्टार अभिनेत्याच्या अनेक पैलूंचा वेध’ असे आहे. चित्रपटाचे हे क्षेत्र मोहनगरी असून तिथल्या हजार प्रकारच्या उलाढाली आणि नाना स्वभावाची माणसे या सगळय़ांत संवेदनशील मनाच्या इरफानने आपले वेगळेपण कसे सिद्ध केले असावे, याचे मूळ हे त्याच्या स्वभावातच आहे. तो कधीच बदलला नाही. लेखक असीम छाब्रा यांनी अत्यंत वेधकपणे त्याच्या सर्व बाबींचा परामर्श घेतला आहे. इरफानसोबत काम केलेल्या व त्याच्या संघर्षाच्या काळापासून सोबत असणाऱया कौटुंबिक तसेच कलाविश्वातील अनेक नामवंत मान्यवरांकडूनदेखील इरफानच्या विषयीचा एक दृष्टिकोन वाचकांपुढे ठेवला आहे. इरफानचे व्यक्तिगत आयुष्य आणि कलेच्या क्षेत्रांतील त्याचा प्रवास तपशीलवार मांडलेला आहे. चरित्र, आत्मकथन किंवा आत्मचरित्र याच्याही पलीकडे घेऊन जाणारे पुष्कळसे संदर्भ या एकाच व्यक्तिरेखेभोवती कसे फेर धरतात हे मोठे विशेष आहे. एखाद्याचे चरित्र उलगडून सांगताना दुर्गाबाई भागवत यांच्या एका वाक्याची आठवण होते. त्या म्हणतात ‘आत्मचरित्र लिहायचं तर आयुष्याला घाट हवा, रंग हवा’, तर पु. ल. देशपांडे सांगतात, ‘सरळ साधं आयुष्य जगलेला माणूस मला आत्मचरित्रात दिसतच नाही, तर वेडेवाकडं जगल्याशिवाय आत्मचरित्र निर्माणच होऊ शकत नाही.’ या व्याख्यांचा आधार घेत इरफान या पुस्तकातून आपल्याला भेटत जातो. पडद्यामागे घडलेल्या असंख्य घटना, त्याने घेतलेली अपार मेहनत, केलेले कष्ट, पदरी आलेली निराशा, यश हे सगळं आपण अनुभवत जातो. त्यातून इरफानच्या लोकविलक्षण प्रतिभेची आणि दुर्दम्य आशावादाची प्रचिती येते.

बॉलीवूडमध्ये इरफानला करीअर घडवावं असं का वाटलं? दिल्लीतल्या नाटय़ प्रशिक्षणाच्या काळात हा उमदा तरुण त्या काळी अभिनय क्षेत्रात कुणाला आपला गुरू मानत असे? त्याला नाटकातच पुढे जावं असं का वाटलं नसावं? अशा कितीतरी गुंतागुंतीच्या प्रश्नांनी, घटनांनी हा नायक चरित्ररूपाने आपल्यापुढे उभा ठाकतो. इरफानला पडद्यावर पाहताना त्याचा शांत, संयत अभिनय त्याची भूमिकेशी असलेली बांधिलकी, ही सगळी गुणसंपदा या पुस्तकातून लेखकाने नेमकेपणाने मांडलेली आहे. या पुस्तकात एकूण आठ प्रकरणांतून त्याच्या सबंध कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. विशेषत त्याच्या भरारीचा काळ, घडणीचा काळ, दूरचित्रवाणीवरील लोकप्रियता, अभिनेता म्हणून घडण होत असताना, हॉलीवूडमधील दोन विश्वात संचार, स्वतभोवतीची चौकट स्वतच मोडत त्याने कलाकार म्हणून घेतलेला अनेक गोष्टींचा शोध या सर्वांची तर्कसंगत मांडणी लेखकाने केलेली आहे. अभिनेता म्हणून इरफानचे व्यक्तिमत्त्व किती संपन्न होते ते या पुस्तकातून अनुभवता येतं. अभिनयाविषयी त्याचं असलेलं अपार प्रेम, वाचन, गुण ग्राहकता याबरोबरच नाटक विश्वात रमणारा, त्यात हरवलेला इरफान जेव्हा या पुस्तकातून आपल्याला दिसतो तेव्हा मात्र आपण अगदी त्या पात्राच्या जवळ असतो. माझ्या मते लेखकाची इथे सर्वात जास्त कसोटी लागते. वाचक आणि त्यातील वातावरणनिर्मिती या दोन्ही गोष्टी इथे समांतर झालेल्या असतात.

इरफानला आयुष्याचं वाचन पचवता आलं होतं. तो जेवढा रसलुब्ध तेवढाच चोखंदळ होता. मनाने हळुवार, वृत्ती काव्यात्म; पण ही वृत्ती आत्मकेंद्रित नव्हती. तिला सामाजिक सुख-दुःखाच्या उत्कट जाणिवेची बैठक होती. सोयिस्कर चाकोरी सोडून स्वतच्या पाऊलवाटेने पुढे जाण्याची हिंमत बाळगणारा हा अभिनेता सर्वार्थाने जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे. जागतिक सिनेमाच्या मोजक्या अभ्यासकांमध्ये प्रतिष्ठित लेखक म्हणून असीम छाब्रा यांची गणना होते. गेल्या 100 वर्षांतील विविध भाषांतले असंख्य सिनेमे त्यांनी केवळ पाहिलेले नाहीत तर बारकाव्यांसह अभ्यासले आहेत. त्यामुळेच तर इरफानच्या प्रत्येक चित्रपटावर त्यातील विशिष्ट प्रसंगांवर त्यांचे अचूक व बारकाईने निरीक्षण नोंदविले आहेत. कित्येक भावुक व अंतर्मुख करणारे क्षण यानिमित्ताने त्यांनी टिपले आहेत.

इरफान खान या नायकाचा हा कलाप्रवास अभिव्यक्तीच्या पातळीवर समजून घेताना प्रस्तुत पुस्तकाची मदत होते. इरफानच्या वास्तव जीवनाच्या जवळ जाणारे लेखन आणि त्याचा तेवढाच मराठीतला तरल अनुवाद मनाला भावतो. नीता कुलकर्णी यांची अनुवादाची शैली तेवढीच लालित्यपूर्ण आहे.

स्वतच स्वतची पाऊलवाट निर्माण करत व या वाटेने चालण्यासाठी अनेकांना प्रेरणा देत, इरफानचा हा रस्ता आता हमरस्ता झाला आहे. कुठल्याही प्रकारचा सिनेमा असो इरफान आजपर्यंत वेगळं रुपडं घेऊन प्रेक्षकांसमोर यायचा. एक अस्वस्थ तरीही मनस्वी कलावंत समजून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.

[email protected]