स्वामी चिंचोली हत्याकांड, नाहीतर घडले असते मोठे हत्याकांड

दोन्ही चिमुरड्यांचा गळा घोटल्यानंतर उच्चशिक्षित महिलेने पतीचाही खून करण्यासाठी पाऊल उचलले होते. मात्र, नशीब बलवत्तर असल्यामुळे नवऱ्याचा जीव वाचला आहे. हल्लेखोर महिलेने कोयता नक्ऱ्याच्या गळ्यावर मारला. मात्र, हल्ल्यात तरुणाने आरडाओरड करीत स्वतःच्या आई-वडिलांना बोलावले. त्यानंतर घाबरलेल्या हल्लेखोर महिलेने कोयता फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात शनिवारी ही घटना घडली.

पियू दुर्योधन मिंढे (वय अडीच), शंभू दुर्योधन मिंढे (वय सव्वा वर्ष) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी कोमल दुर्योधन मिंढे (वय 30, सर्व रा. स्वामी चिंचोली) हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिने गाढ झोपेत असलेले पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय 36) यांच्यावर कोयत्याने वार केला.

कौटुंबिक वादातून हल्लेखोर कोमलने अडीच वर्षांची मुलगी आणि सव्वा वर्षांच्या मुलाची ओढणीने घरातच गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने अंगणात झोपलेल्या दुर्योधनवर कोयत्याने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि कोयत्याच्या वारामुळे त्याने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारील खोलीत झोपलेल्या दुर्योधनच्या आई-वडिलांनी धाव घेतली. सगळे जागे झाल्यानंतर आरडाओरड सुरू झाली. त्यानंतर हल्लेखोर महिलेने हातातील कोयता फेकून दिला. जखमी झालेल्या दुर्योधनवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उच्चशिक्षित महिलेने स्वतःच्या मुलांची हत्या केल्याने दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

चिमुरड्यांवर शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

■ दुर्योधन हा माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता असून, लॉकडाऊनपासून तो घरातून काम करीत आहे. त्याची हल्लेखोर पत्नी कोमल शिक्षित असून, संबंधित कुटुंबीय स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर राहायला आहे. दरम्यान, हत्याकांडामुळे स्वामी चिंचोली गावकऱ्यांवर शोककळा पसरली असून, दोन्ही चिमुरड्यांवर शनिवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.