बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी मुंब्रादेवीच्या पायथ्याशी पोलीस व्हॅनमध्येच एन्काऊंटर केला. मात्र हा एन्काऊंटर आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गृह विभागाच्या कामगिरीवर सर्वच विरोधी पक्ष, ज्येष्ठ कायदेपंडित, निवृत्त पोलीस अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज शासनाने तातडीने या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडे सोपवला. त्यामुळे ही चकमक खरी की खोटी याचीच चर्चा राज्यासह देशभरात सुरू झाली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात भाजपच्या बडय़ा धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या टीकेनंतर सरकारच्या कारभारावरच संशयाचे मोहोळ उठले आहे.
नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मात्र एन्काऊंटरच्या तपशीलातील विसंगती तासाभरातच जगजाहीर झाल्यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. विरोधी पक्षांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्येष्ठ विधिज्ञ, निवृत्त पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही हातात बेडय़ा घातलेला अक्षय पोलिसांचे रिव्हॉल्वर कसा काय खेचू शकतो, असा सवाल केला. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी मात्र सरकार पुढे आले नाही. मुळात एन्काऊंटर झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने याबाबतची माहिती जाहीर करणे गरजेचे होते. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस माध्यमांसमोर आले. एकूणच या प्रकरणात संशयाचे मोहोळ उठल्याने शासनाने या एन्काऊंटरचा तपास आज सीआयडीकडे सुपूर्द केला.
21 तासांनंतर पोलिसांची प्रेस कॉन्फरन्स; अवघ्या पाच मिनिटांत गुंडाळली
अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीत ठार मारल्यानंतर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या गंभीर प्रकरणाची माहिती ठाणे पोलिसांनी तत्काळ द्यायला हवी होती. मात्र याप्रकरणी पोलीस बोलायला तयार नव्हते. दरम्यान तब्बल 21 तासानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी हे माध्यमासमोर आले आणि अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांनी पत्रकार परिषद गुंडाळली. मुळात डीसीपी किंवा अन्य बड्या अधिकाऱ्याने माहिती देणे गरजेचे असताना जनसंपर्क अधिकाऱ्याला पुढे केल्याने गृहखाते आणि पोलिसांवरचा संशय अधिक बळावला आहे.
एन्काऊंटर करणारे संजय शिंदे वादग्रस्त अधिकारी
1992 पासून मुंबईच्या पोलीस दलात अनेक वर्षे क्राईम ब्रँचमध्ये आणि त्यानंतर ठाणे क्राईम ब्रँचमध्ये काम करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर केले. संजय शिंदे हे अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. 1998-2000 च्या काळात मुंबईत गँगवार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील परदेशात असलेल्या हस्तकांसोबत संजय शिंदे यांचे फोन कॉल्सद्वारे संभाषण झाले होते. हे संभाषण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐकले होते. एका उद्योगपतीला धमकावून खंडणी वसूल करण्यात आली होती. त्यावेळी शिंदे यांचे दाऊद टोळीच्या हस्तकासोबत फोन कॉल्स झाल्याचे उघड झाले. त्यावेळी शिंदे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु गँगवॉर ऐनभरात असताना पोलिसांची प्रतिमा आणखी डागाळू नये म्हणून शिंदे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.
गटारी साजरी करण्यासाठी लेडिज बारमध्ये गेलेल्या शिंदे यांनी नशेत गोळीबार केला होता. त्यावेळी एक गोळी त्यांच्या पायात घुसली आणि ते एका पायाने अपंग झाले. त्यावेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. डझनभर हत्येचे गुन्हे दाखल असलेला विजय पालांडे याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप शिंदेंवर होता. पालांडेच्या गाडीत शिंदे यांचा युनिफॉर्म सापडला होता. त्यानंतर शिंदे यांना ठाण्यातील बहुचर्चित एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांनी आश्रय दिला आणि त्यांची बदली ठाणे क्राईम ब्रँचमध्ये झाली. तेव्हापासून ते ठाणे क्राईम ब्रँचमध्येच कार्यरत आहेत.
राजकीय फायद्यासाठी शिंदेंना खोके देऊन एन्काऊंटर घडवल्याची चर्चा
संजय शिंदे यांची निवृत्ती सहा महिन्यांवर आली असतानाच त्यांना खोके देऊन अक्षय शिंदेचे एन्काऊंटर घडवल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करून त्याचा राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांना होईल. मात्र निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या संजय शिंदे यांच्या मागे या संशयास्पद एन्काऊंटर प्रकरणामुळे न्यायालयीन चौकशीचा ससेमिरा लागेल आणि ते दोषी ठरले तर त्यांना शिक्षा होण्याची शक्यता असल्याचीही चर्चा होत आहे.
पोलीस म्हणतात…
तळोजा जेलमधून पोलीस व्हॅनमधून आणताना आरोपी अक्षय शिंदे वारंवार पोलिसांना शिवीगाळ करत होता. मला सोडा.. मला जाऊ द्या असे ओरडत होता.
अक्षय शिंदे आरडाओरडा करत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी पोलीस व्हॅनमध्ये ड्रायव्हरशेजारी बसलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना फोन करून सांगितले.
यानंतर संजय शिंदे व्हॅनमधून उतरून आरोपीच्या समोर येऊन बसले. त्यांच्यासमोर कॉन्स्टेबल हरिश तावडे बसले होते.
तर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि कॉन्स्टेबल अभिजित मोरे यांच्यामध्ये अक्षय शिंदे बसला होता.
यावेळी अचानक अक्षय आक्रमक होऊन निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचू लागला. या झटापटीत रिव्हॉल्वरमधून उडालेली गोळी मोरे यांच्या पायाला लागली आणि ते खाली पडले.
याच वेळी अक्षय शिंदे याने रिव्हॉल्वरचा ताबा घेऊन दोन राऊंड फायर केले. मात्र सुदैवाने गोळी कुणालाही लागली नाही.
अक्षय शिंदे आणखी गोळी झाडण्याच्या तयारीत असतानाच संजय शिंदे यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून अक्षयवर गोळी झाडली. त्यात तो खाली पडला.
सीआयडीचे पथक मुंब्रादेवीच्या पायथ्याला
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांवर टीकेची झोड उठताच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. आज सीआयडी पथकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेऊन लागलीच या प्रकरणाचा तपास सुरू केला. सायंकाळी ज्या ठिकाणी चकमक घडली त्या मुंब्रादेवीच्या पायथ्याला या पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी या पथकाने एन्काऊंटर ज्या गाडीत झाला त्या पोलीस व्हॅनची पाहणी करून काही दस्तावेज ताब्यात घेतले.
अक्षयचा मृतदेह कुटुंबीय आज ताब्यात घेणार
जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात आज रात्री 8 वाजता आणण्यात आला. रात्री शिंदे याचे कुटुंबीय कळवा रुग्णालयात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अक्षयचे वडील आण्णा शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावर आपण उद्या बुधवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे म्हणाले.
सात तास शवविच्छेदन.. मृतदेह कळवा रुग्णालयाच्या शवागृहात
सोमवारी रात्री अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पाच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल सात तास शवविच्छेदन सुरू होते. शवविच्छेदनाचा अहवाल आज प्रसिद्ध केला. त्यानुसार अति रक्तस्रावामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याचे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शवविच्छेदनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना दिला आहे, तर शवविच्छेदन झाल्यानंतर जे. जे. रुग्णालयातून आणलेला अक्षयचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली केला जाणार आहे का? याबाबतची कोणतीही स्पष्टता पोलिसांनी दिलेली नाही.
पोलीस व्हॅनमधील महाराष्ट्रातील पहिलाच एन्काऊंटर
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबाबत उलटसुलट चर्चा होत असतानाच पोलीस दलातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख, एन्काऊंटर स्पेशलिस्ट रवींद्र आंग्रे यांनी काही धक्कादायक माहिती दिली. पोलीस व्हॅनमध्ये झालेला हा एन्काऊंटर महाराष्ट्रातील पहिलाच असल्याचे म्हणाले. ज्यांनी एन्काऊंटर केला त्या संजय शिंदे यांना न्यायालयात जस्टीफाय करणे थोडे कठीण होऊ शकेल. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना घडत असल्या तरी महाराष्ट्रात मात्र असे कधी घडले नव्हते, असेही आंग्रे यांनी सांगितले.
सोमवारी नेमके काय घडले?
अक्षय शिंदेविरोधात बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. या अत्याचाराव्यतिरिक्त आणखी दोन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे अक्षयवर दाखल होते. अक्षयची पहिली पत्नी लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी त्याला सोडून गेली होती. तिने अक्षयविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. तिच्या तक्रारीनुसार कल्याण कोर्टाने अक्षयला पोलीस कोठडी सुनावली. अक्षयच्या पत्नीने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ठाणे क्राइम ब्रँचचे पथक सोमवारी तळोजा तुरुंगातून अक्षयला ठाण्याला घेऊन येत असताना मुंब्य्राजवळ एन्काऊंटरची घटना घडली.