विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचे निलंबन आज तिसऱया दिवशी मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आक्रमक अंबादास दानवे यांचा उद्या, शुक्रवारपासून पुन्हा आवाज घुमणार आहे. सोमवारी विधान परिषदेत झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र आज हे निलंबन दोन दिवसांनी कमी करीत आवाजी मतदानाने रद्द करण्यात आले.
राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षाकडून सरकारला अनेक प्रश्नांवर धारेवर धरण्यात येत आहे. यामध्ये सोमवारी राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यावेळी प्रसाद लाड यांनी चिथावणीखोरपणे हातवारे केल्यानंतर दानवे यांनी त्यांना खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले होते, मात्र अपशब्द वापरल्याचे सांगत दानवे यांचे सभापतींनी पाच दिवसांसाठी निलंबन करीत असल्याचे घोषित केले होते. यावर सभापतींचा निर्णय एकांगी आणि अन्यायकारक असल्याची टीका दानवे यांनी केली होती. यानंतर बुधवारी शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांनी दानवे यांच्या निलंबनाविरोधात उपसभापतींना निवेदन करीत निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. निलंबन मागे घ्यावे यासाठी विरोधकांनी बुधवारी सभागृहात ठिय्यादेखील मारला होता. आज दानवे यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याने निलंबन मागे घेत असल्याची घोषणा सभापतींकडून करण्यात आली.