जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला पोलीस चौकीवर संशयास्पद ग्रेनेड हल्ला

प्रातिनिधिक फोटो

जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पोलीस चौकी ओल्ड टाउनजवळ संशयास्पद ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती समोर येत असल्यानं सुरक्षेची चिंता निर्माण झाली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी रात्री 9.20 वाजता, पोलीस चौकीच्या मागील बाजूने स्फोटासारखा आवाज ऐकू आला, ज्यामुळे तातडीने सुरक्षा पथके तैनात करण्यात आली. इतर सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधून पोलीस पथकांनी या परिसराला त्वरीत वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

रात्री 10.40 वाजता, सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलीस चौकीच्या सुरक्षा भिंतीजवळ एक ग्रेनेड पिन सापडली, ज्यामुळे स्फोटक फेकल्याचा संशय बळावला आहे.

अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे की पोलीस चौकीच्या आवारातच स्फोट झाला परंतु तो ग्रेनेड अशा भागात पडला होता जिथे कोणीही उपस्थित नव्हते. कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, स्फोटाच्या ठिकाणी खड्डा देखील पडला नसल्याचं सांगण्यात येत असल्याचं इंडिया टुडेच्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटलं आहे.

या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि हल्ल्यामागील लोकांची ओळख पटविण्यासाठी परिसरात आणि आसपास शोध मोहीम सुरू आहे.

दरम्यान, बारामुल्ला पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती जवळच्या पोलीस युनिटला देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.