समाजभान – पोटगीबाबत पुनर्विचार होणे गरजेचे

>> सुषमा जयवंत

घटस्फोटामुळे अन्याय झालेल्या स्त्रियांना न्याय मिळावा, त्यांचे व मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून कायद्यात पोटगीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु आजच्या काळात घटस्फोटाचा आणि पोटगीचा बाजार मांडला गेला आहे. महिला म्हणून मिळालेल्या तरतुदीचा लाभ घेत दोन-तीन महिन्यांत/वर्षांत संसार मोडायचा आणि नवऱ्याकडून पोटगीची रक्कम वसूल करायची असे प्रकार हल्ली सर्रास दिसून येत आहेत. याबाबत कायद्याच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. मुलांची बाजूदेखील विचारात घेतली पाहिजे. कायद्यानुसार हुंडा घेणे वा देणे हा जसा गुन्हा आहे तसाच कायदा पोटगीबाबतही व्हायला हवा.

पूर्वी मुलींचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आईवडील मुलीला आणि जावयाला हुंडा द्यायचे. पण लोभ इतका वाईट असतो की हुंडा न मिळाल्यामुळे त्या स्त्राrवर अत्याचार व्हायचे. अत्याचार इतका वाढला की समाजाची हिंमत हुंडाबळीपर्यंत गेली. त्यामुळे माणसाची हावरट विकृती समोर आली. आता शहरात हुंडा देण्याघेण्याची प्रथा जवळपास नष्ट होत आली आहे. कारण यावर कायद्याने बंदी घातली आहे. आताच्या बदलत्या काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले. त्यामुळे आता एक नवीन प्रथा जन्माला आली आणि ती म्हणजे पोटगी! फरक इतकाच की हुंडाबळी मुली असायच्या आणि आता पोटगीचे बळी ठरले आहेत मुलगे!

खरे तर घटस्फोटामुळे अन्याय झालेल्या स्त्रियांना न्याय मिळावा, त्यांचे व मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून कायद्यात ती तरतूद करण्यात आली. परंतु आजच्या काळात काही (विकृत) मुलींनी त्याचा बाजार मांडला आहे. दोन-तीन महिन्यांत/वर्षांत संसार मोडायचा आणि मुलांकडून पोटगीची रक्कम वसूल करायची. जर तुम्ही हुंडा न मागता जगू शकता तर मुलींनी पोटगीशिवायही जगायला हवे.

समाजात कायम स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाबद्दलच बोलले जाते. आज थोडा पुरुषांचाही विचार करायला हवा. गेल्या काही दशकांत स्त्रियांवर झालेल्या अत्याचारामुळे प्रसंगी त्यांना प्राण गमवावे लागले असल्याने कायद्यात स्त्रियांसाठी बरीच तरतूद करण्यात आली आहे. परंतु तशी तरतूद पुरूषांसाठी नाही. ज्या स्त्रियांवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळायलाच हवा. पण मग ज्या पुरुषांवर अन्याय होतोय त्यांनी काय करावे? घटस्फोट घेताना पोटगीला समाजमान्यता आहे पण तेच लग्न करताना हुंडा घेतला तर तो गुन्हा ठरतो. समाजात असे दुहेरी मापदंड का? मुलगा आणि मुलगी जर समान असतील, दोघेही सक्षम असतील तर मग कुणाचेही आर्थिक शोषण योग्य नाही.

हल्ली तिचे किंवा त्याचे लग्न काही महिने टिकते आणि आता ते वेगळे होत आहेत, असे फार ऐकायला येऊ लागले आहे. तसेच मुलीने तिच्या उदरनिर्वाहासाठी 20 लाख रुपये मागितले आहेत. हा कुठला उदरनिर्वाह आहे? मुलाला उदरनिर्वाह नाही का? खरोखरच जिथे अन्याय झाला असेल तिथे शिक्षा अपेक्षित किंवा अनिर्वायच म्हणायला हवी. सध्या अशी अल्पकाळ लग्न टिकलेली अनेक जोडपी दिसतात. लग्नाच्या बोहल्यावर चढले नाहीत तो घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे राहतात. खरेतर लग्नानंतर एकमेकांना, एकमेकांच्या नातेवाईकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ देणे अपेक्षित असते. थोडय़ा संयमाची, त्यागाची गरज असते.

काही मुली लग्नानंतर अगदी वर्षभर किंवा कधी कधी काही महिने एकत्र राहिल्यानंतर मग पटत नाही म्हणून घटस्फोट घेतात. त्यासाठी भरपूर पोटगी घेतात. पण मुळात मुद्दा हा आहे जर हुंडा घेणे चुकीचे आहे तर पोटगी घेणेही चूकच आहे आणि ज्या मुलींना लग्नातून फक्त त्रासच मिळाला आहे त्या मुली पोटगीसाठी अनेक वर्ष भांडत बसण्यापेक्षा सरळ सोडचिठ्ठी देऊन आयुष्याला नव्याने सुरुवात करतील. पण ज्या मुलींने कायदा चुकीच्या पद्धतीने हाताळला आहे वा न्यायालयीन नियमांचा चुकीचा वापर केला आहे तर अशा मुलींना शिक्षा व्हायला हवीच.

स्त्री-पुरुष समान आहेत ना, मग नियम पण समानच असावेत. याच मुद्दय़ाला अनुसरून सध्याचीच काही ज्वलंत उदाहरणे  पाहायला मिळतात. स्वबळावर मी माझे नाव, पैसा, प्रसिद्धी कमावली आहे असे म्हणणाऱया धनश्री वर्माने न्यायालयात पती यजुवेंद्र चहलच्या विरोधात घटस्फोटाचा खटला लढताना पाच कोटी रुपयांची मागणी केली आणि चहलला ती मागणी मान्य करावी लागली. धनश्री तर स्वत कमावती आहे. प्रसिद्ध आहे. मग हे लाड जाता जाता तरी चहलने का पुरवावे? चहल तरी त्या मानाने स्वस्तात सुटला म्हणावे लागेल. जर आपण हृतिक रोशनने त्याची पत्नी सुझान खानला दिलेली पोटगीची किंमत पहिली तर आकडा नुसता उच्चारताना बोबडी वळेल. नुकतीच प्रकाशझोतात आलेली घटना म्हणजे एका तरुण युवकाने बायकोच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. तेही मोबाइलवर रेकॉर्डिंग करून केली. कारण जगाला खरे काय ते कळावे यासाठी त्याने तसे केले होते.

एकूण काय तर न्यायालयाने यावर अधिक अभ्यास करावा आणि या मुद्द्याला गांभीर्याने घेऊन समतोल तोडगा काढावा एवढीच आशा एक सामान्य नागरिक म्हणून मी करू शकते.

(लेखिका टीव्ही-सिनेअभिनेत्री आहेत)