नागपूर दंगल अंगलट आल्यानेच दिशा सालियान प्रकरण पुढे केले, भाजपकडून नीच राजकारण – सुषमा अंधारे

‘नागपूर दंगलीतील काही आरोपी भाजपशी संबंधित आहेत. यंत्रणांनी ते शोधावेत; अन्यथा आम्ही त्याचे पुरावे लवकरच जाहीर करू. नागपूर दंगल आता भाजपच्या अंगलट आली आहे. म्हणूनच भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले असून, एखाद्याच्या दुःखाला आपले राजकारण करण्याचे नीच काम भाजपकडून केले जात आहे,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूर दंगल यासह मंत्री नितेश राणे, आमदार चित्रा वाघ यांच्या वक्तव्यांवर टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाले; पण त्यांच्याकडे दाखवण्यासारखे एकही काम नाही. उलट धनंजय मुंडेंचा राजीनामा, जयकुमार गोरेंचे प्रकरण असो की, माणिकराव कोकाटेंची सदस्यता, यामुळे हे सरकार बॅकफूटवर गेले आहे. या सरकारला नवा मुद्दा पाहिजे होता म्हणूनच त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला. मात्र, कबरीवर बोलणारे नितेश राणे यांना माहिती पाहिजे की रंगून येथे औरंगजेबाच्या वंशजाच्या मजारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी का फुलं वाहत आहेत? यावर राणे बोलणार नाहीत. राणेंना जेवढे काम दिले आहे तेवढेच ते करतील. असे सांगून अंधारे यांनी पंतप्रधान यांचा फुल वाहतानाचा फोटो दाखविला, राणेंना जुहूमधील बंगला वाचवण्यासाठी आणि त्यांची पापे लपवण्यासाठी भाजपमध्ये जावे लागले,’ अशी टीका त्यांनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘चित्रा वाघ यांनी सभागृहाची गरिमा घालवली. त्यांनी केवळ आरोप करून अनेकांचे करिअर खराब करण्याचे काम केले आहे. वाघ बाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाणसारख्या भटक्या जातीतील पोरीचं भांडवल करत होत्या. तसेच राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्या प्रकरणातदेखील पीडित तरुणीला चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं. तुला एफआयआरप्रमाणेच बोलावं लागेल. माझा चित्रा वाघ यांनी व्हिडीओदेखील काढला होता, असेही पीडित तरुणीने सांगितल्याचे सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले. त्यांच्या नवऱ्यावर 1 लाखाची लाच घेण्याचे आरोप झाले. त्यात त्यांना आपल्या नवऱ्याने १ लाखाची लाच मागितली, याचा संताप होत असावा. 1 लाख म्हणजे वाघ यांच्यासाठी खूपच चिंधीगिरी आहे. त्यात दहा-पाच कोटींची रक्कम असती तर जरा सुटेबल वाटली असती, अशीही टीका अंधारे यांनी केली. याच बाई कधीकाळी पक्षप्रवेशासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या,’ असेही अंधारे यांनी सांगितले. यावेळी शहर संघटिका करुणा घाडगे, रेखा कोंडे, अनंत घरत उपस्थित होते.

…झोपडपट्टीलासुद्धा एक क्लास असतो

‘काल सभागृहात एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंना तसा तो नाद आहे, त्या तशाच वागत राहतात. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण म्हणाले की, त्यांनी झोपडपट्टीतील भाषा वापरली. पण झोपडपट्टीलासुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोक गरीब असतात; पण ते कधीच आपले इमान विकत नाहीत’, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.