
रोहित शर्माच्या टी-20 निवृत्तीनंतर उपकर्णधार हार्दिक पंडय़ाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण अचानक कहानी में ट्विस्ट आला आहे. आता हिंदुस्थानच्या वेगवान संघाचे नेतृत्व मुंबईकर झंझावाती फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंडय़ापेक्षा सूर्याचा फिटनेस जबरदस्त असल्यामुळे टी-20 नेतृत्वासाठी बीसीसीआय या धडाकेबाज फलंदाजाचे हार्दिक अभिनंदन करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. हिंदुस्थानच्या टी-20 संघाच्या नेतृत्वाबाबत असलेला सस्पेन्स या आठवडय़ात संपण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रोहित शर्माच्या टी-20 निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघाच्या कर्णधारपदाबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक उपकर्णधार होता. म्हणून त्याला बढती दिली जाण्याची शक्यता होती. तसेही तो गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचाही कर्णधार होता. त्यामुळे कर्णधारपदाच्या नेतृत्वात तोच शर्यतीत पुढे होता. मात्र फिटनेस आणि भविष्यकाळाचा विचार करता पंडय़ापेक्षा सूर्या प्रभावी ठरला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नजरेत सूर्या लंबी रेस का घोडा असल्यामुळे त्यालाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे समोर आले आहे.
कर्णधार म्हणून सूर्याची घणाघाती सुरुवात
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सात सामने खेळला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत त्याने पाच विजय नोंदवले होते तर दोन सामन्यांत त्याला पराभव पचवावा लागला होता. या दोन्ही मालिका हिंदुस्थाननेच जिंकल्या होत्या. एवढेच नव्हे तर या सामन्यांत दोन अर्धशतके आणि एक शतक ठोकताना त्याने 300 धावांचा पाऊस पाडला होता.
गंभीर नव्या रूपात
आजवर हिंदुस्थानचा आक्रमक फलंदाज म्हणून लौकिक असलेले गौतम गंभीर हे नाव आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील साडेतीन वर्षे हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहे. ही भूमिका श्रीलंका दौऱयापासून ते निभावणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपचे सहयजमानपद हिंदुस्थानच भूषवणार असल्यामुळे गंभीर यांच्याकडून टी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीचीच अपेक्षा राहील.