सूर्या कधी तळपणार? 6 डावांमध्ये फक्त 37 धावा, रणजीतही फ्लॉप शो; चाहते नाराज

टीम इंडियाच्या टी20 संघाता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या फॉर्मात नसल्यामुळे चाहत्यांच्या रडारवर आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत 4-1 असे वर्चस्व गाजवत मालिका जिंकली. तसेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. कर्णधार म्हणून सूर्यकुमारने स्वत:ला सिद्ध केले आहे, परंतु त्याच्या फलंदाजीची धार गायब झाली आहे.

सूर्यकुमार यादव सध्या रणजी करंडकामध्ये मुंबईच्या संघाकडून खेळत आहे. पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला सूर्या 5 चेंडूंमध्ये 9 धावा करत तंबुत परतला. हरयाणाचा वेगवान गोलंदाज सुमित कुमारने त्याची दांडी उडवली. सूर्यकुमार यादवचा खेळ गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत सुमार राहिला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे मिळून त्याने एकून 6 डावांमध्ये फक्त 37 धावा केल्या आहेत. त्यामुळे चाहतेही आता म्हणत आहेत सूर्या तु कधी तळपणार.

कर्णधार पदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवने 15 टी-20 सामन्यांमध्ये 18.42 च्या सरासरीने फक्त 258 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकून 83 टी20 सामने खेळले आहेत. त्याने 38.20 च्या सरासरीने 2598 धावा केल्या असून त्याच्या नावावर चार शतके आणि 21 अर्धशतके आहेत.