दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थानला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर मुंबई संघात दाखल झालेल्या सूर्यकुमार यादवने 70 धावांची तर शिवम दुबेने 71 धावांची नाबाद खेळी करत सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत मुंबईला सेनादलाविरुद्ध 39 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयामुळे मुंबईच्या उपउपांत्य फेरी प्रवेशाच्या आशा कायम असून आंध्रविरुद्ध 5 डिसेंबरला होणाऱ्या लढतीत मोठा विजय मिळवण्याचे मुंबईसमोर आव्हान असेल.
आज हिंदुस्थानी टी-20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी खेळला. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या पृथ्वी शॉला आज धावांचे खातेही उघडता आले नाही. कर्णधार श्रेयस अय्यरही (20) फार मोठी खेळी करू शकला नाही आणि अजिंक्य रहाणेच्या (20) बॅटीतूनही चौकार-षटकारांचा पाऊस पडला नाही. तेव्हा सूर्यकुमार यादवची बॅट तळपली. त्याने शिवम दुबेच्या साथीने सेनादलाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले. दोघांनी 11 षटके फलंदाजी करत 130 धावांचा पाऊस पाडला. सूर्याची बॅट शेवटच्या षटकांत शांत झाली. त्याआधी त्याने 46 चेंडूंत 7 चौकार 4 षटकारांची बरसात केली. पण शिवम दुबेचा घणाघात आणखी भेदक होता. त्याने आपल्या 37 चेंडूंच्या खेळीत 7 षटकार खेचले तर केवळ 2 चौकार लगावले. तो 71 धावांवर नाबाद राहिला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे मुंबईला 4 बाद 192 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
शार्दुलची कमाल
सेनादलाला मुंबईचे 193 धावांचे आव्हान पेलवलेच नाही. शार्दुल ठाकुरने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये आघाडीच्या चारही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत मुंबईचा मोठा विजय निश्चित केला. 4 बाद 34 अशा दुर्दशेनंतर सेनादलाचा कर्णधार मोहित अहलावतने 54 धावांची खेळी करत विकास हाथवालासोबत (22) 74 धावांची भागी रचली. पण ही जोडी फुटल्यानंतर सेनादलाने मान टाकली. परिणामता त्यांचा संघ 153 धावांतच आटोपला. शार्दुलने 25 धावांत 4 तर शम्स मुलानीने 40 धावांत 3 विकेट घेतले.
उपांत्यपूर्व फेरीचा फैसला नेट रनरेटवर
पाच गटांमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. ‘अ’ गटात बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तिन्ही संघांनी पाच सामने जिंकले आहेत. ‘ब’ गटात बडोदा, सौराष्ट्र आणि गुजरातनेही पाच विजयांसह 20 गुण संपादले आहेत. ‘क’ गटात दिल्ली आणि झारखंड 20 गुणांसह आघाडीवर आहेत. त्यामुळे या आठ संघांच्या तीन गटांतून उपउपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांचा फैसला नेट रनरेटवरच लागणार आहे.
‘ड’ गटात मात्र विदर्भ पुढील फेरीत जाणार असला तरी अन्य तीन संघांचा फैसला शेवटच्या साखळी लढतीनंतरच लागेल. ‘इ’ गटात असलेल्या मुंबईची अखेरची लढत आंध्रविरुद्ध होत असून विजय अनिवार्य आहे. जर मुंबईला पराभवाचा धक्का बसला तर केरळ आणि मुंबईपैकी नेट रनरेटमध्ये सरस असलेला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवेल. ‘ड’ आणि ‘इ’ गटातील अव्वल दोन-दोन संघांमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार असून विजयी संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.