छोटीशी गोष्ट – नन्नाची यादी!

>> सुरेश वांदिले

“कंटाळा आलाय गं फार,’’ तेजोमयी, अलेक्झा गोर्जीला म्हणाली. ती काही उत्तर देण्याच्या आधीच, अलेक्झांडरकडे वळून तेजोमयीने विचारलं.
“अलेक्झू, तुला नाही आला कारे कंटाळा?’’ “नाही बां!’’ अशा आशयाची मान आणि शेपूट अलेक्झांडरने हलवली. गोर्जीला हसू आलं.
“गोर्जे, दात दाखवायला काय झालं तुला?’’
“मला कुठे काय झालं? मला तर तुझ्यासारखा कंटाळाही आला नाही.’’
“आगाऊपणा करू नकोस.’’
“अगं, वर्षाचा शेवट, दोन दिवसांवर आला असताना, मी कसाकाय आगाउढपणा करू शकते? माझी काय बिशाद.’’

“मग, माझा कंटाळा घालव की!’’ तेजोमयी गोर्जीला म्हणाली. हिचा कंटाळा कसा घालवायचा, याचा विचार करण्यासाठी गोर्जीने काही क्षण डोळे मिटले. तिला एक आयडिया सुचली. तिने टाळीसाठी तेजोमयीकडे हात पुढे केला. गोर्जीला, उत्तर मिळाल्याचे ध्यानात आल्याने अलेक्झांडरनेही त्याचा डावा पंजा तिच्या समोर केला. तिघांनी टाळी दिल्यावर गोर्जीने, तेजोमयीला एक कागद घ्यायला लावला. गोर्जीने तेजोमयीला कागदावर एक यादी करायला सांगितली. तिथेच फतकल मारून अलेक्झांडर, दोघींकडे आलटूनपालटून उत्सुकतेने बघू लागला.

खरंतर, तेजोमयीला लिहिण्याचाही कंटाळाच आला होता. पण ती, बळेबळे गोर्जी सांगते तसं लिहू लागली. त्या वेळी तिचं मन दुसरीकडेच भिरभिरत होतं. ती यांत्रिकपणे लिहीत असल्याने, आपण काय लिहितोय, हे तिच्या लक्षात येत नव्हतं.

“पुढचा मुद्दा लिह…’’ गोर्जी म्हणाली.
तेजोमयीने लिहिलं, “मी नवीन वर्षी पिझ्झा, बर्गर आणि कोणत्याही जंकफूडसाठी आग्रह करणार नाही. मोबाइलवर गेम खेळणार नाही. घोकमपट्टी करणार नाही. खोटं बोलणार नाही. उठसूट टीव्ही बघणार नाही. प्लॅस्टिकची पिशवी वापरणार नाही. पुस्तकांवर खाडाखोड करणार नाही. अवांतर वाचनासाठी नाही म्हणणार नाही. अन्न वाया घालवणार नाही. कुणाचीही निंदानालस्ती करणार नाही. आळस करणार नाही. योगवर्गाला बुट्टी मारणार नाही.’’

बुट्टी शब्द कानावर पडताच तेजोमयी भानावर आली.
“गोर्जेटले, हे काय चाललंय तुझं, हे नाही, ते नाही. सगळी नन्नाची यादी.’’
“अगं, खरोखरच नन्नाचीच यादी किंवा ‘न’-यादी म्हण, आहे.’’
“मला कशाला भरीस घातलं, हे नन्ना फन्ना लिहायला.’’ तेजोमयीने रागाने विचारलं.
“अगं, नव्या वर्षासाठी अनेक जण, टू डू लिस्ट म्हणजे, हे करणार नि ते करणार, अशी यादी करतात.’’
“मी पण करते ना. त्यात काय ग्रेट आहे.’’
“त्यात काही ग्रेट नाही, म्हणूनच तर मीही तुला, ‘न‘-यादी किंवा नॉट टू डू लिस्ट करायला सांगितलीय ना.’’ गोर्जी हसून म्हणाली. तेजोमयीने गोर्जीची, ‘न’-यादी जोराने वाचली. अलेक्झांडरने कान टवकारून ती ऐकली.
“पण गोर्जे, याने काय होणार. हे कर, ते कर, असं सांगण्याऐवजी, तू तर, हे करू नको नि ते करू नकोस हेच सांगितलंस.’’

“अगं, सर्वांचं नवं वर्ष छान, मजेत जाण्यासाठी ‘न’-यादीच जास्त उपयोगाची. ही यादी, तुम्हाला चांगला माणूस, चांगली व्यक्ती बनवते. चांगली व्यक्तीच, उत्तम कार्य करू शकते नि त्याची टू डू लिस्टही व्यवस्थित मार्गी लागते.’’

गोर्जी, काहीतरी भारी बोललीय हे तेजोमयीच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा गोर्जीने सांगितलेली, ‘न’-यादी तिने वाचून काढली. ही यादी वाचतावाचता, तिचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. ही ‘न’-यादी कितीही वाढवता येऊ शकते, हे तिच्या लक्षात आलं, तिने पुढचा मुद्दा लिहिला, नव्या वर्षात कधीही कंटाळा करणार नाही… हे बघून गोर्जी आंनदली. तिने अलेक्झांडरकडे हात केला. समोरचा पाय पुढे करून अलेक्झांडरने टाळी टाळी केली. “पण, मिस्टर अलेक्झांडर तुम्हीसुद्धा नव्या वर्षात, कुणावरही उगाचंच भुंकायचं नाही हं.’’ तेजोमयीने, त्याचा कान हलकेच ओढत, अलेक्झांडरला सुनावलं. शेपूट आणि मान हलवून, आपल्यालाही ‘न’-यादी मान्य असल्याचं त्याने सांगून टाकलं.