छोटीशी गोष्ट – बाणेदारपणा

>> सुरेश वांदिले

“मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही,’’ हे लोकमान्य टिळकांचं सुप्रसिध्द वाक्य बरेचदा रवीच्या कानावरून गेलं होतं. लोकमान्यांचं बरोबरच होतं. चूक केली नसताना शिक्षा का बरं भोगायची? पण वर्गात कुणी टरफलं किंवा पॉपकॉर्नचं प्लॅस्टिक टाकल्यास दुसऱया दिवशी स्वच्छक येईपर्यंत ते तसंच ठेवायचं का? हा प्रश्न रवीला पडायचा.

वर्गातील बंटी बावनकुळे हा दांडगट मुलगा अधूनमधून असा कचरा करायचा. हे रवीला अजिबात आवडायचं नाही. तो हा कचरा ताबडतोब उचलून कचरापेटीत टाकायचा. हे बघून बंटीला आणखी चेव यायचा. परवासुध्दा असंच घडलं. बंटीने नेहमीपेक्षा अधिक कचरा सरांच्या टेबलाजवळ टाकला. रवी त्यावेळी ग्रंथालयात पुस्तक आणण्यासाठी गेला होता. तासिकेची घंटी झाल्यावर तो पुस्तकं घेऊन वर्गाकडे धावत सुटला. वाटेत सरांनी त्याला बघितलं. “अरे, असा का धावतोस?’’ त्यांनी रवीला थांबवत विचारलं. पण त्याच्याकडील पुस्तकं बघत, “वा वा शाबास! अवांतर वाचन केलं की, आपण आणखी समृध्द होतो,’’ अशी प्रतिक्रिया देत रवीला सोबत घेऊन ते वर्गाकडे निघाले.

वर्गात रवी नसल्याचं बंटीच्या लक्षात आलं नव्हतं. तासिकेची घंटी झाली तरी रवी कसा काय कचरा उचलण्यासाठी उठला नाही, हे बघण्यासाठी बंटी इकडेतिकडे बघू लागला. रवी वर्गात नाही हे लक्षात येताच त्याच्या घशाला कोरड पडली. आता सर आले तर…? हा प्रश्न पडून तो शहारला. त्याच वेळी सरांसोबत रवी वर्गात दाखल झाला. टेबलाजवळचा कचरा बघून सर संतापले. त्यांनी रवी सोडून सर्वांना उभं केलं.

आपली तक्रार करण्यासाठीच, रवी सरांकडे गेला असावा, अशी शंका बंटीला आली. शाळा सुटल्यावर याला चांगलंच बदडून काढू, असं त्याने मनोमन ठरवलं.

“कचरा कुणी केला?’’ रागावून सरांनी विचारलं. कुणीही तोंड उघडेना. बंटीसोबत पंगा घेण्याची कुणाची तयारी नव्हती. सर आणखी चिडले. ज्याने कचरा केला असेल, तो दोन मिनिटांत समोर आला नाही तर, सर्वांनाच शिक्षा करेन, सर गरजले.

एवढय़ात रवी कचरा उचलू लागला. रवी ग्रंथालयात होता आणि आपल्यासोबतच वर्गात आल्याचे सरांच्या लक्षात आले. ते रवीला म्हणाले, “तू कशाला कचरा उचलतोस? तूच हा गुन्हा केला, असं सगळ्यांना वाटेल.’’

“सर, मी कचरा टाकला नसला तरी, तो उचलून वर्ग स्वच्छ करणं मला माझं कर्तव्य वाटतं. कचरा कुणी केला, याचा शोध घेण्यापेक्षा तो साफ करणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. याची शिक्षा तुम्ही मला देत असाल तर मी तयार आहे.’’ असं बोलून रवीने कचरा उचलून बाहेरच्या कचरापेटीत टाकला. सरांसमोर येऊन त्याने हात पुढे केला. सारा वर्ग अवाक् झाला. बंटीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो झर्रदिशी सरांच्या समोर आला. स्वतःचा हात सरांच्या समोर केला. “म्हणजे खरा गुन्हेगार तू आहेस तर?’’ सर रागावत म्हणाले.

“होय सर, मीच कचरा टाकला. त्यामुळे रवीला काही करू नका. याला खिजवण्यासाठी मी दररोज असा कचरा टाकतो. हा शांतपणे कचरा उचलतो. आज हा वर्गात नाही, हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण त्याच्या आत्ताच्या वागण्याने, कचरा करण्यात पराक्रम नसून तो उचलण्यात असल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मलाच शिक्षा करा.’’ बंटी खाली मान घालून म्हणाला.

“शिक्षा तर झालीच पाहिजे. उद्या सगळा वर्ग तू स्वच्छ कर.’’ सरांनी बंटीला शिक्षा फर्मावली. रवीची मनसोक्त प्रशंसा केली. बाणेदारपणा हा प्रश्न सोडवण्यात असतो. तो अधिक चिघळवण्यात नसतो, हे रवीने आपल्या कृतीतून वर्गाच्या लक्षात आणून दिलं.