पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे धकाधक आणि दगदगीचे जीवन. सततच्या कामातून करमणूक, विरंगुळा तर फारच कमीच. मात्र, राज्यातील अनेक पोलीस बांधव आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. त्यातीलच एक आहेत गगनबावडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुरेश कांबळे. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या बहारदार आवाजाने ते मनोरंजन करीत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांची गाण्यांची प्रचंड क्रेझ असून, कलाप्रेमींकडून त्यांना चांगलीच दाद मिळत आहे.
गायक कुमार सानू यांचे ‘सोचेंगे तुम्हे प्यार करते नही,’ हे गाणे गाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जगजीत सिंह यांची गझल ‘होश वालों की खबर क्या’ कुमार सानू यांचे ‘मेरा चाँद मुझे आया है नजर’ मराठीतील ‘सूर तेच छेडिता’ अशी अनेक गाणी कांबळे यांनी गायली आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या आवाजातील गाण्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आपल्यातील कलागुणांमुळे ते अधिकारी व कर्मचारीवर्गात प्रिय आहेत.
शाळेपासून गाण्याची आवड होती. मात्र, नोकरीदेखील महत्त्वाची होती. त्यामुळेच व्यावसायिक गायक होता आले नाही. परंतु, कामाच्या ताणतणावातून विरंगुळा जपण्यासाठी आणि आपली आवड जोपासण्यासाठी ही कला जपली असल्याचे ते सांगतात. मूळचे पन्हाळा तालुक्यातील उत्र गावचे रहिवासी असलेले कांबळे 2013 मध्ये ते कोल्हापूर पोलीस दलात रुजू झाले. सध्या गगनबावडा पोलीस ठाण्यामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत.
काम कितीही मोठं असलं तरीही आवड असली की, सवड मिळतेच. हाच एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेची सेवा करण्याबरोबरच स्वतःचा आनंद स्वतःला घेता यावा आणि पोलीस कामाच्या तणावातून विरंगुळा मिळण्यासाठी आपण ही कला जपली आहे.
– सुरेश कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल, गगनबावडा.