खोका पकडला… सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड व उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले आणि त्याचे पंटर एकाला बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि ही अमानुषता पाहून राज्य पुन्हा हादरून गेले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतःहून फिर्याद देत सतीश भोसलेसह चौघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खोक्या भोसलेच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत शिकारीचे मोठे साहित्य सापडले होते.

खोक्याभाईची दहशत

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या निकट वर्तुळातील म्हणून सतीश भोसलेची ओळख आहे. ‘खोकेभाई’, ‘गोल्डमॅन’ अशीही त्याची दुसरी ओळख आहे. हा खोकेभाई आलिशान गाड्यांचा मालक आहे. गाडय़ांवरून नोटांची उधळण करतानाचे त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हेलिकॉप्टरमधून उतरतानाचाही त्याचा एक व्हिडीओ आहे. या भोसलेकडे एवढा पैसा आला कोठून, असा सवाल आता विचारला जात आहे.