बीडमधील केज तालुक्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा आरोप केला. संतोष देशमुख यांची हत्या दीड कोटीसाठी झाली, असे सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येमागे आकाच मेन सूत्रधार आहे, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला.
आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग चार तास मारलं. याचना करतो विनंती करतो, तुमची नावं कोणाला सांगणार नाही, मला मारू नका. मला पाणी पाजा… पाणी पाजा म्हटल्यावर ह्यानी दुसरं काहीतरी पाजलं. ज्याचा उल्लेख मी इथे करू शकत नाही जिथे माझ्या माय माउल्या बसलेल्या आहेत. संतोष धायमोकलून रडत होता. त्याचे व्हिडिओ काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. आणि तिकडून आका सांगत होता बहोत अच्छे मार रहे हो और मारो. तुम्हाला पैशांचा माज आलाय, असा हल्ला सुरेश धस यांनी चढवला.
‘आका बरोबर त्याचा आका पण बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे’
अवादा कंपनीने फिर्याद दिली होती. यांची फिर्याद घेऊ नका म्हणून एका माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आला. एसआयटी आणि पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की, ज्याने कोणी फोन केला यांची अॅस्ट्रॉसिटी घेऊ नका, खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो यांच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. गुन्हा दाखल करू नका असं म्हणणाराच मुख्य आरोपी आहे. आकाचं आणि त्याच्या आकाचं बोलणं झालं असेल तर आका बरोबर त्याचा आका पण बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
सातजणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्का लागला पाहिजे. 302 मध्येही आका आहे. आका म्हणतो माझा संबंध नाही. पण तोच सूत्रधार आहे. तूच तर मेन आहे. आणि वरचा आका… 19 ऑक्टोबरला स्वतःच्या सातपुडा बंगल्यावर ज्या मंत्र्याने बैठक घेतली तो यातला आरोपी नाही, हे कसं? पोलिसांनीच मला समजून सांगावं? संतोष देशमुखांची हत्या राहिलेल्या दीड कोटीसाठी झाली. 50 लाख यांनी निवडणुकीतच घेतले होते. दीड कोटी राहिले होते. वाल्याकाका आम्हाला सांगायचं ना, दीड नाही तीन कोटी गोळा करून आमच्या संतोषसाठी आम्ही दिले असते, असे सुरेश धस म्हणाले.