
राज्यात आतापर्यंत भूमाफिया वाळू माफिया, मुरूम माफिया, मुंबईतील माफियांची नावे ऐकली होती, मात्र राज्यात पीक विमा माफिया ही नवी जमात तयार झाली आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज सरकारला घरचा अहेर दिला. राज्यातील पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावरून त्यांनी महायुती सरकारवरच हल्लाबोल केला.
सत्ताधारी पक्षाच्यावतीने आज विधानसभेत नियम 293च्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत धस यांनी पीक विमा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढला. सन 2020 आणि 2023चा पीक विमा शेतकऱयांना मिळाला नसल्याचे सांगत सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याची कार्यपद्धती सांगितली.