बीड जिल्ह्यात महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून अब्जावधींचा घोटाळा, मलेशियापर्यंत कनेक्शन; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची आज भेट घेतली. या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला आहे. महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील टेंभुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचं ट्रॅन्झॅक्शन झालं आहे. 100 कोटींचा घोटाळा झाल्यावर ईडीची चौकशी लागते. तर 9 अब्ज रुपयांचं ट्रॅन्झॅक्शन एकाच व्यक्तीच्या नावावर झालं असेल तर याच्यावर कोणत्या यंत्रणेनं कारवाई करावी, हे ठरवलं गेलं पाहिजे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथे काम करणारे दोन अधिकारी होते. ती नवां मी जाहीर करून शकत नाही. पोलीस अधीक्षकांना ती नावं सांगितली. एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज असे बरेच लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयांचा घोटाळा हा महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात झालेला आहे. आणि या प्रकरणी चांगली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं. आणि जे निष्क्रीय अधिकारी आहेत त्यांना नेमण्यात आले. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रकरणात जामीन करून देणं, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची लिंक थेट मलेशियापर्यंत जाते. अशा गंभीर गुन्हात अतिशय चुकीचं काम करणारे पोलीस इथं ठेवलेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल निष्क्रिय स्वरूपाचं इथं दाखवलं गेलं, असे एकामागून एक अनेक आरोप सुरेश धस यांनी केले.

बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील पोलिसांची यादी आपल्याला द्यावी, अशी मागणी सुरेश यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या लेखी पत्रातून आज केली. ही यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे द्या. बीड जिल्ह्यातील पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का? आणि नसेल तर हा अन्याय आहे आणि चूक आहे. हे राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन. आणि त्याच्यावर जी अ‍ॅक्शन घ्यायची ती राज्याचे मुख्यमंत्री करतील, असे सुरेश धस म्हणाले.

या घोटाळ्याच्या पाठिमागे सुद्धा तिथे जसं ‘आका’ आहे. ‘आका’ सोडून कोण असणार आहे याच्या पाठिमागे? बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठिमागे ‘आका’ आहे. बीडमधील रोज एक प्रकरण समोर येतंय, असा आरोप सुरेश धस यांनी केला. परळी आणखी एक पॅटर्न आहे, गायरान जमिनीवर पूर्ण ताबा घ्यायचा. तीनशे तीनशे वीट भट्ट्या बगलच्च्यांनी घ्यायच्या. विधानसभेत बोलल्यानंतर वाळू माफिया टरकले आहेत. परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत. प्रत्येक राखेच्या गाडीवर ‘एक्सवायझेड’ कोणाचा तरी टोल होता. तो टोल देता देता अनेकांच्या नाकी नऊ आले. यामुळे राखेचं गौडबंगाल बंद करा, हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे. कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयांमध्ये उलाढाल होईल, असे ते व्यवसाय आहेत. नियमा प्रमाणे असेल तर आमचा विरोध नाही. पण गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथे नाही, असे जे सुरू आहे ते थांबावं, अशी आमची मागणी असल्याचे सुरेश धस म्हणाले.

राज्यात सरपंचांवर हल्ल्याच्या इतर घटाना घडल्या असतील त्या कदाचित टेक्निकल असतील. ही घटना जी घडली आहे त्याचं आणि यांचं साम्य होऊ शकत नाही. हे फार भयानक… भयानक आणि भयानक आहे. याला वर्णनच कोणतं करावं? ग दी माडगुळकर असे काही आता नाही राहिलेले. त्यांच्या भाषेत या घटनेचं वर्णन केलं भीषणता समोर येईल. सर्वपक्षीय मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत. सहभागी नाही झालोत तर लोक जोड्याने हाणतील ना आम्हाला. ज्यांना नाही यायचं ते नको का येईना. याचं आम्हाला काय करायचं? असे सुरेश धस म्हणाले.