उमेद – ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतावर आधारित आश्रमशाळा

>> सुरेश चव्हाण

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळील वाघेरा या आदिवासी भागात महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळाजिने वेगळी शिक्षणपद्धती अवलंबली आहे. 1999 पासून पायाभूत शिक्षणासह कृतिशील शिक्षण देणारी ही आश्रमशाळा या भागातील मुलांसाठी उज्ज्वल मार्गदर्शक ठरली आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी भागात शासनातर्फे आश्रमशाळा चालवल्या जातात, अशीच एक नाशिकपासून पश्चिमेला 35 किलोमीटरवरील त्र्यंबकेश्वरजवळील ‘वाघेरा’ या आदिवासी गावात नाशिकमधील प्रसिद्ध महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित ‘विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा’ आहे. ही शाळा खासगी अनुदानित आश्रमशाळेत मोडते. सध्या सहा एकर परिसरात ही आश्रमशाळा उभी आहे. 1999 साली नाशिकमधील वासाळी या गावी शाळेची स्थापना झाली होती. पुढे 2004 मध्ये हीच शाळा ‘वाघेरा’ या गावी स्थलांतरित करण्यात आली. या परिसरातील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली आहे. यात निवासासह शिक्षण व्यवस्था आहे. आज या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरतात. दहावीपर्यंतचे तसेच अकरावी व बारावी विज्ञान व कला या शाखांचेही मोफत शिक्षण येथे दिले जाते. ही अंशत अनुदानित शाळा असून यातील शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी शासनाकडे आहे. उर्वरित खर्च हा संस्थेच्या निधीतून पुरवला जातो. तसेच महाराष्ट्र समाज सेवा संघाद्वारे रचना विद्यालय, नाशिक यांच्या निधीतून ही शाळा चालविली जाते. यात संगीत, संगणक, क्रीडा व कला शिक्षक हे संस्थेच्या निधीतून नेमले जातात. संस्थेला हा निधी नाशिकमधील विविध खासगी कंपन्यांकडून दिला जातो.

या शाळेत पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गात ई-लर्निंग यंत्रणा आहे. त्यात इंटरनेटच्या जोडणीसह अद्ययावत गोष्टींचा अंतर्भाव आहे. ही शाळा गेल्या पाच वर्षांपासून ‘ज्ञानरचनावादाच्या सिद्धांता’नुसार काम करते. ही पद्धत सुरू करण्याआधी इथले विद्यार्थी हे अभ्यासात कमी पडत असत; तेव्हा त्यांना सातारा जिह्यातील कुमठे-बीट इथल्या ज्ञानरचनावादी शाळेची माहिती मिळाली. तेव्हा या शाळेचे दोन शिक्षक यशवंत शिवदे व प्रदीप मोरे हे तिथे पाहणीला गेले. त्यांनी ही पद्धत जाणून घेतली व इकडे येऊन इतर सहकाऱयांसह ती आत्मसात केली. त्यानंतर हा प्रयोग या शाळेतही राबवायला सुरुवात केली. या प्रयोगामुळे शालेय विद्यार्थ्यांमधे आमूलाग्र बदल जाणवले. याचा आदर्श दाखला म्हणजे इथली मुले इंग्रजीत छान बोलायला लागली. त्यांची गणिते सहजगत्या सुटू लागली. चौथीच्या मुलांनाही थोडेफार इंग्रजी यायला लागले. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांमधे मोठे बदल दिसून आले. त्यांचा स्पर्धा परीक्षा व बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उत्तम लागू लागला. देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या वारे सरांच्या पुण्यातील वाबळेवाडी शाळेतून प्रेरणा घेऊन ही शाळा वाटचाल करत आहे. शाळेने जवळपास सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत राज्यातील आदिवासी भागातील आश्रमशाळांची वेगळी गुणवत्ता यादी असते. यात गेल्या काही वर्षांपासून विठ्ठलराव पटवर्धन शाळा कायम अग्रगण्य आहे.

क्रीडा क्षेत्रातही शाळेने चमकदार कामगिरी केली आहे. इथले खेळाडू सर्व प्रकारच्या खेळांत यशस्वी होतात. यांपैकी सर्वोच्च कामगिरी म्हणजे राज्य शासनाच्या ‘मिशन शौर्य-2’ अंतर्गत राज्यातील 10 विद्यार्थी 2018 मध्ये ‘माऊंट एव्हरेस्ट’च्या मोहिमेवर गेले होते. यामध्ये या आश्रमशाळेचा विद्यार्थी कुमार मनोहर हिलीम या विद्यार्थ्याने एव्हरेस्ट शिखर सर करून त्यावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. या कामगिरीबद्दल शासनानेदेखील त्याचा सन्मान केला. मेघा हलकंदर या आदिवासी मुलीची रशियामधे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी निवड झाली, तर हर्षदा महाले या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थिनीने ‘जेईई अॅडव्हान्स’ या परीक्षेत भारतातून 629 वा क्रमांक पटकावला आहे. योग्य मार्गदर्शन, चिकाटी व संधी उपलब्ध झाल्यास प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आदिवासी मुलंही असामान्य कर्तृत्व घडवतात. या आश्रमशाळेचे संस्था सदस्य रत्नाकर पटवर्धन यांच्या प्रेरणेने नामदेव कचरे या प्राथमिक शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी जुडो प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यात शाळेने अनेक राज्यस्तरीय पदपे पटकावली आहेत. पुण्यातील मार्शल कॅडेट फोर्सच्या माध्यमातून संस्थेचे 200 विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत. हादेखील प्रयोग आश्रमशाळेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच होत आहे. एकूणच शिक्षण, कला आणि क्रीडा या क्षेत्रात इथले विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत. याचे श्रेय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप चौधरी आणि माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पवार व त्यांचे सहकारी शिक्षक यांचे आहे.

विशेष म्हणजे या शाळेत मुलींची संख्या जवळपास 60 टक्के आहे. आदिवासी भागातील बहुतांशी शाळांमधून दिसणारे एक सर्वसाधारण चित्र म्हणजे बारावी झाल्यानंतर मुलींच्या पालकांचा त्यांचे लग्न लावून देण्याकडे कल असतो. मात्र याबाबतीत ही शाळा काहीशी अपवाद असून यातील बहुतांशी मुली या शिक्षण घेण्यावर ठाम असून त्या पुढील शिक्षण घेत आहेत. यासाठी शिक्षकांना त्या पालकांचे आणि विद्यार्थीनींचे सतत प्रबोधन करावे लागते. तसेच शाळेतील मुलींची गळती थांबावी, म्हणून संस्थेने ‘नन्ही कली’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा व नांदी फाऊंडेशन हे प्रायोजक आहेत. पहिली ते बारावीपर्यंत एकूण 700 विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना, कोणताही न्यूनगंड वाटू नये, यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळा व संस्था प्रमुखांचा निरंतर प्रयत्न चालू आहे. त्यासाठी शाळेत संगीत, कला, क्रीडा, संगणक हे विषय शिकवले जातात. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच रोजगाराच्या दृष्टीने विविध व्यावसायिक कौशल्यं अवगत असावीत, या उद्देशाने तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य विकास साधण्यासाठी आश्रमशाळेत विज्ञान आश्रम, पाबळ व टाटा टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या सहकार्यातून कौशल्याधिष्ठित उपक्रमांची सुरुवात झाली आहे. या उपक्रमांसाठी शाळेत स्वतंत्र कार्यशाळा आहे. यातून विद्यार्थ्यांनी स्वतच्या पायांवर उभे राहून त्यांच्या जीवनात त्यांना सक्षम नागरिक बनविण्याचा प्रयत्न या आश्रमशाळेत केला जातो.

[email protected]