>> सुरेश चव्हाण
पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांनी 1956 पासून डहाणू जिह्यातील कोसबाड येथे ‘नूतन बाल शिक्षण संघ’ या संस्थेची स्थापना करून बाल शिक्षणविषयक अनंत प्रयोग केले. या प्रयोगांमधे मॉन्टेसरी पद्धतीवर आधारित शिक्षणविषयक मूलतत्त्वे, कार्यपद्धती व शिक्षण साधनांमधे गरजेनुसार फेरफार करून शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील, अशी शैक्षणिक साधने तयार केली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ तसेच ‘अंगणवाडी’, ‘बालवाडी’ अशा प्रयोगशील संकल्पना त्यांनी समाजात रुजवल्या.
जगात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा शास्त्राrय दृष्टीने विचार प्रथम जर्मन बाल मानसतज्ञ फेड्रिक फ्रोबेल यांनी केला. त्यांनी विकसित केलेल्या पूर्व प्राथमिक शिक्षण पद्धतीला ‘किंडर गार्डन’ (बालोद्यान) हे नाव दिलं. इटली येथील मॉन्टेसरी यांनी मागासवर्गीय मुलांचा वैद्यकीय दृष्टीने अभ्यास करून एक शिक्षण पद्धती तयार केली, जी ‘मॉन्टेसरी’ या नावाने जगन्मान्य झाली. या दोन्ही पद्धतींचा अभ्यास करून त्यांना भारतीय गरजांनुसार आयाम देण्याचे काम गुजरातेत ‘गिजुभाई बधेका’ आणि ‘ताराबाई मोडक’ यांनी केले. या दोघांनी विकसित केलेल्या भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या पद्धतीला ‘गीता (गिजुभाई व ताराबाई) पद्धत’ म्हणून लोक ओळखू लागले.
ताराबाईंनी एकदा पाचगणी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना भेटून आपले बाल शिक्षणाविषयीचे कार्य व त्यासंबंधीचे विचार त्यांच्यासमोर मांडले. गांधीजींनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्याला आशीर्वाद दिले आणि त्यांना म्हणाले, ‘ताराबाई, तुमच्या बाल शिक्षणाच्या पार्श्वभागी मॉन्टेसरी पद्धत व असलेली त्यांची साधनं फार महाग असतात. तेव्हा या शिक्षणासाठी भारतीय पार्श्वभूमी; भारतातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीशी मिळती-जुळती अशी बैठक तयार करा. शैक्षणिक साधनं स्वस्त व स्थानिक कारागिरांना तयार करता येतील, शिक्षकांचा त्यात जास्तीत जास्त सहभाग असेल असे पाहा. थोडक्यात काय, तर इटलीतील मॅडम मॉन्टेसरीची तत्त्वे स्वीकारा; परंतु त्याला भारतीय स्वरूप द्या. भारताची, भारतासाठी अशी बाल शिक्षण पद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे हे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी ठरेल. स्वतंत्र भारतातील भावी पिढय़ांमध्ये सुसंस्कृत व आदर्श नागरिक घडविण्याचे पायाभूत शिक्षण, म्हणून ही बाल शिक्षण पद्धती उचित ठरेल!’
गांधीजींच्या या प्रेरणादायी व प्रोत्साहनयुक्त आशीर्वादाने ताराबाईंचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी हे आव्हान स्वीकारून आपले लक्ष शहरांकडून खेडय़ांकडे वळविले. मुंबईच्या शिशुविहार शिक्षण केंद्राची जबाबदारी त्यांनी आपले सहकारी शेष नामले व शिष्या सरलाताई देवधर यांच्यावर सोपवून; ‘अनुताई वाघ’ या नव्या सहकार्यकर्तीला सोबत घेऊन ठाणे (तत्कालीन जिल्हा, आता पालघर) जिह्यातील बोर्डी या गावी प्रस्थान केले. 24 डिसेंबर 1945 साली ताराबाईंनी बोर्डी येथे ‘नूतन बाल शिक्षण संघा’च्या वतीने ‘ग्राम बाल शिक्षा केंद्र’ या नव्या संस्थेची स्थापना केली. 1945 ते 1956 या एक तपाच्या काळात ताराबाई व अनुताई यांनी बाल शिक्षणविषयक अनंत प्रयोग केले.
बोर्डी येथील अध्यापन मंदिर हे बहुभाषीय व बहुप्रांतीय होते. गुजरात, केरळ, बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, कश्मीर या प्रांतातून निघालेल्या बालमंदिरांमधील शिक्षक या अध्यापन मंदिरातून प्रशिक्षण घेऊन पुन्हा आपली बालमंदिरे चालविण्यासाठी आपापल्या ठिकाणी जात होते. एक तपाच्या प्रदीर्घ परिश्रमांतून ‘नूतन बाल शिक्षण पद्धती’ ताराबाईंनी प्रस्थापित केली व त्यातून ग्रामीण बाल शिक्षणाची एक मजबूत बैठक तयार झाली. याच बैठकीवर आज ‘भारतातील बाल शिक्षणाची इमारत’ उभी आहे. ‘बालवाडी’, ‘अंगणवाडी’ या शब्दांची उत्पत्ती पण बोर्डीतच झाली. गुजरातमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ जुगतरामभाई दवे हे बोर्डीला ताराबाईंचे काम पाहण्यास नेहमी येत असत. बालमंदिराविषयी चर्चेत त्यांनी एकदा ताराबाईंना म्हटले, ‘बोर्डीला चिकूच्या वाडय़ा आहेत, तर तुमच्या या बालमंदिरालाही ‘बालवाडी’ म्हटले तर कसे वाटेल?’ ताराबाईंना हा शब्द खूप आवडला व त्यांनी आपल्या बालमंदिरांचे नामांतर ‘बालवाडी’त केले. तसेच सुरुवातीच्या काळात लहान मुलांची शाळा आदिवासींच्या घराच्या अंगणात भरत असे. त्यालाही ‘अंगणवाडी’ असे नाव पडले. आज संपूर्ण भारतात ‘अंगणवाडी’, ‘बालवाडी’ हे शब्द प्रचलित आहेत.
बोर्डी येथील बाल शिक्षणाच्या प्रयोगांसोबतच ताराबाईंनी संस्थेच्या आजूबाजूच्या आदिवासी कुटुंबांशी साधलेल्या संपर्कातून असे दिसले की, दारिद्रय़, अज्ञान, अंधश्रद्धा यांत गुरफटलेल्या या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन, त्यातून त्यांना बाहेर काढणे व त्यासाठी आपण स्वत पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांनी अनुताईंशी विचारविनिमय करून बोर्डीच्या परिसरात आठ-दहा ठिकाणी आदिवासींच्या वस्त्यांमध्येच अंगणवाडय़ा सुरू केल्या.
आदिवासी मुलं शाळेत येत नाहीत, कारण त्यांना गुरं चारायला कुरणात जावे लागते. त्यावर ताराबाई म्हणाल्या, ‘ठीक आहे. मुलं शाळेत येत नाहीत ना, मग आपण आपली शाळाच जिथे मुलं असतील तिथे नेऊ या! आपले शिक्षक कुरणात जातील व तिथेच गुरं चारण्याच्या कामाबरोबर त्यांची शाळाही घेतील.’ तिथेच ‘कुरण शाळे’ची सुरुवात झाली. आठ-नऊ वर्षांची आदिवासी मुलं चिकूच्या वाडय़ांमध्ये व इतरत्र मजुरीला जातात, म्हणून ती शाळेत येत नाहीत. हे ताराबाईंना समजल्यावर त्या म्हणाल्या, ‘आपण शाळेला जोडून उद्योग वर्ग सुरू करूया! मुलं अर्धवेळ काम करतील आणि अर्धवेळ शिकतील!’ त्यातून ‘उद्योग शाळे’चा जन्म झाला. अशा प्रकारे ‘कुरण शाळा’, ‘रात्र शाळा’, ‘प्रौढ शिक्षण वर्ग’, ‘बालगोपाळ मंडळे’, ‘क्रीडा केंद्रे’, ‘छंद वर्ग’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘रंजन कार्यक्रम’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे अनेकविध उपक्रम त्यांनी सुरू केले.
ताराबाईंनी सुरू केलेलं ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक 90 वर्षे पार करत आजही सुरू आहे. ताराबाई नेहमी म्हणायच्या की, ‘मुलांना बोन्साय करू नका. त्यांना वटवृक्षासारखं वाढू द्या!’ हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यांचे हे विचार आजही अतिशय मोलाचे व मार्गदर्शनपर आहेत.